चंद्रकांत पाटलांनी ‘प्राथमिक शिक्षण’ पूर्ण केलं असतं तर…. रुपाली चाकणकरांचा खोचक टोला


मुंबईः महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त वक्तव्य करून महापुरूषांचा अपमान करणारे भाजप नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून टिकेची झोड उठली असून ‘चंद्रकांत पाटलांनी ‘प्राथमिक शिक्षण’ पूर्ण केलं असतं तर त्यांनी असे वक्तव्य केलेच नसते’ असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

पैठण येथील संतपीठाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. चंद्रकांत पाटलांच्या निषेधार्थ काल औरंगाबादेत विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमपणे आंदोलनही केले आहे.

आवश्य वाचाः फुले-आंबेडकरांनी भीक मागितली आणि शाळा चालवल्या: उच्च शिक्षणमंत्री चंद्रकात पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य, पहा व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘उच्च  आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालू केल्या, असे वक्तव्य केले आहे. मला असे वाटते की, चंद्रकांत पाटील यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचा कारभार हाती घेण्याआधी आपले ‘प्राथमिक शिक्षण’ पूर्ण केले असते तर त्यांनी हे वक्तव्य केलेच नसते, अशा खोचक शब्दांत रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

महात्मा फुले हे त्या काळातील एक प्रथितयश उद्योगपती होते आणि ज्ञानाचा महासागर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली हे जगजाहीर आहे. आपण जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे आपल्या महापुरूषांबद्दल आपल्या मनात किती पूर्वदूषित धारणा आहे, हे दिसून येत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी यापुढे अशी वक्तव्य करताना प्राथमिक शिक्षणाचे धडे घ्यावेत, हीच माफक अपेक्षा आहे, असा उपरोधिक सल्लाही चाकणकर यांनी या ट्विटमध्ये दिला आहे.

आता मी मूक भाषा शिकणार-चंद्रकांत पाटीलः महापुरूषांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतरही चंद्रकांत पाटील यांना आपण काही चुकीचे बोललो आहोत, असे वाटत नाही, हेच त्यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन मांडलेल्या भूमिकेवरून स्पष्ट होते. चंद्रकांत पाटलांनी या पत्रकार परिषदेत आपण काहीही चूक केलेली नाही, असेच ध्वनित केले.

हेही वाचाः चंद्रकांत पाटलांचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांची औरंगाबादेत धरपकड, राज्यभरात संतापाची लाट

 ‘मी माध्यमांचे आभार मानतो. कारण त्यांच्या माध्यमातून लोकांना ती क्लिप बघायला मिळाली. लोक म्हणत आहेत की यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? ‘टेरर’ असणाऱ्या एका मोठ्या पोलिस अधिकाऱ्याचा फोन आला आणि तो म्हणाला यात नेमके काय आहे? या व्हिडीओत आक्षेप घेण्यासारखे काय आहे, हेच मी लोकांना विचारलं. त्यावर लोकांचे समाधान झाले. असे वाद होत असल्याने मी आता मूक भाषा शिकणार आहे, मला मदत करा,’ असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *