
जालनाः राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयात कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे संस्थाचालकांकडून पदोपदी कसे आर्थिक शोषण केले जाते याचीच साक्ष देणारी लाचखोरीची मोठी घटना आज जालना येथील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात घडली. तब्बल वर्षभरापूर्वी प्रबंधकपदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अर्जित रजांच्या रोखीकरणासह सेवानिवृत्तीचे अन्य लाभ देण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना या महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह पाच कर्मचाऱ्यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जालन्याच्या परिवर्तन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने १९९३ पासून जालन्यातच महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय हे अशासकीय अनुदानित महाविद्यालय चालवण्यात येते. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे या संस्थेचे अध्यक्ष तर त्यांचे विश्वासू सहकारी ऍड. ब्रह्मानंद चव्हाण हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आठवले हे या संस्थेचे अध्यक्ष असले तरी संस्थेच्या आर्थिक बाबींसह सर्वच कारभार ब्रह्मानंद चव्हाण हेच पाहतात. असे असले तरी एका राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या आणि त्यातल्या त्यात ‘न खाऊंगा ना खाने दूंगा’ अशी गर्जना करणाऱ्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या नेत्याचाच महाविद्यालयात चालखोरीचा हा प्रकार घडल्यामुळे विविध तर्कांना उधाण आले आहे.
जालन्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पोलिस उपअधीक्षक बाळू जाधवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीबीकडे लाचखोरीची तक्रार करणारे तक्रारदार हे महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयातून ३० जून २०२५ रोजी प्रबंधक पदावरून सेवानिवृत्त झाले. तक्रारदाराला त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणारे ३०० दिवसांच्या अर्जित रजा रोखीकरणाच्या ९ लाख ३३ हजार ४०८ रुपये रकमेचा धनादेश, कालबद्ध पदोन्नतीचे लाक्ष आणि जीपीएफची रक्कम देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल नारायण हिवराळे, कार्यालय अधीक्षक बबन रामदास राठोड, लिपीक कैलास गबाजी कुरंगळे, ग्रंथालय सहायक ज्ञानेश्वर मुरलीधर मदन आणि पहारेकरी ईश्वरदास अंबादास शिंदे यांनी १लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
आर्थिक शोषणामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सेवानिवृत्त प्रबंधकाने लाचेची मागणी करणाऱ्यांची चांगलीच जिरवण्याचा निश्चय केला आणि थेट जालन्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांचे कार्यालय गाठून तक्रार दिली. सेवानिवृत्त प्रबंधकाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना एसीबीच्या पथकाने ३० जून रोजी दुपारी १ ते पावणेदोन वाजेच्या सुमारास महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात जाऊन पडताळणी केली असता तक्रारदाराकडून १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जालना एसीबीच्या पथकाने आज दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांनी महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात सापळा रचला आणि एसीबीच्या पथकाने प्राचार्य राहुल नारायण हिवराळे, कार्यालय अधीक्षक बबन रामदास राठोड, लिपीक कैलास गबाजी कुरंगळे, ग्रंथालय सहायक ज्ञानेश्वर मुरलीधर मदन आणि पहारेकरी ईश्वरदास अंबादास शिंदे यांनी सेवानिवृत्त प्रबंधकाकडून १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून त्यांना ताब्यात घेतले.
प्राचार्यांसह पाचही आरोपींविरुद्ध तालुका पोलिस ठाणे जालना येथे कलम ७ व कलम १२ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून गुन्हा दाखल होताच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बाळु जाधवर यांनी सांगितले. या कारवाईत पर्यवेक्षक अधिकारी म्हणून जाधव यांनी काम पाहिले तर पोलिस हेडकॉन्स्टेबल अतिश तिडके, गजानन खरात, पोलिस अंमलदार गजानन कांबळे, गणेश चेके, शिवलिंग खुळे, अमोल चेके, मनोहर भुतेकर, संदीप लहाने व चालक भालचंद्र बनोरकर यांनी हा सापळा यशस्वी केला.
लाच मागितली कोणी आणि अडकले कोण?
एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्यासाठी एखाद्या महाविद्यालयाचा प्राचार्य, कार्यालय अधीक्षक, ग्रंथालय सहायक, लिपीक आणि पहारेकरी एवढ्या मोठ्या लाचेच्या रकमेची मागणी कशी काय करू शकतात? असा कळीचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणावरून उपस्थित केला जात आहे. एसीबीच्या जाळ्यात अडकलेले प्राचार्यांसह अन्य कर्मचारी हे या लाचखोरीच्या प्रकरणातील फक्त मोहरे आहेत आणि लाचेची मागणी करणारा मुख्य सूत्रधार दुसराच कोणीतरी आहे, अशीच जास्त शक्यता या प्रकरणात असल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आता पुढील तपासाची चक्रे त्या दिशेने फिरवून मुख्यसूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
