
नवी दिल्लीः कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल ३६ दिवस निडरपणे केलेल्या आंदोलनापुढे मान तुकवत मोदी सरकारने अखेर नमते घेतले आणि आज दुपारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर केंद्र सरकारने कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) तिन्ही मागण्या केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने जंरत-मंतरवरील आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलंकानी शांततापूर्ण मार्गाने जंतर-मंतर रिकामे करावे आणि आपल्या घरी जावे असे आवाहन सीजेपीच्या वतीने आंदोलकांना करण्यात आले.
नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही कॉक्रोच जनता पार्टीची पहिली व मुख्य मागणी आज दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मान्य झाली. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त कानी पडताच जंतर-मंतरवरील आंदोलकांनी जल्लोष केला. परंतु उर्वरित मागण्याही मान्य करा, त्याशिवाय आम्ही जंतर-मंतर सोडणार नाही, अशी घोषणा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज शनिवारी दुपारी ३.३० वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह तिसऱ्या टप्प्यातील चर्चा करण्यासाठी पोहोचले. कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सरकारशी चर्चा केली. या चर्चेनंतर दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला सरकारकडून केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह तर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने सीजेपी प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका उपस्थित होते. याच संयुक्त पत्रकार परिषदेत सरकारने तिन्ही मागण्या मान्य केल्यामुळे जंतर-मंतरवरील आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा सीजेपीच्या प्रवक्त्यांनी केली.
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबतची चर्चा सरकारात्मक आणि यशस्वी झाली आहे. सरकारने आमच्या सगळ्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. आमचा लढा यशस्वी झाला आहे. त्यामुळे सीजेपी जंतर-मंतरवरील आंदोलन तातडीने समाप्त करण्याची घोषणा करत आहे. त्यामुळे जराही विलंब न लावता शांततापूर्ण मार्गाने आंदोलकांनी जंतर-मंतर रिकामे करावे आणि आपल्या घरी जावे, असे आम्ही नम्र आवाहन करतो, असे कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांबाबत कॉक्रोच जनता पार्टीने सादर केलेल्या मागण्यांच्या चार्टरचे अध्ययन करू आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चाही करू. विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील. याबाबत मंगळवारपर्यंत घोषणा केली जाईल, असे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही सरकारच्या शिष्टमंडळाशी तीन फेऱ्यात चर्चा केली. जंतर-मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून आमचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या तीन प्रमुख मागण्या होत्या. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलक आणि आंदोलनाच्या आयोजकांविरुद्ध दाखल करण्यात आलेली सर्व कायदेशीर प्रकरणे आणि एफआयआर रद्द करण्यात यावेत आणि भविष्यात आंदोलक आणि आयोजकांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात येऊ नये तसेच नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी. आता काही वेळापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. याचा अर्थ असा की आमची पहिली मागणी मान्य करण्यात आली आहे, असे सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले. आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या सगळ्या एफआयआर मागे घेतल्या जातील आणि भविष्यात कोणत्याही आंदोलकांविरुद्ध किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या टीमच्या सदस्यांच्या विरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असा विश्वास सरकारने आम्हाला दिला आहे. नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची मागणीही सरकारने मान्य केली आहे, असे रांका म्हणाले.
आंदोलादरम्यानच्या काळात केवळ दिल्लीतच नव्हे तर भाजपशासित राज्यात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सीजेपीने केली होती. सरकारने ही मागणी मान्य केली आहे. एफआयआरच्या कॉपी सीजेपीला देण्याची तयारीही सरकारने दर्शवली आहे. शिवाय भविष्यात देखील कोणताही कारवाई केली जाणार नाही, असे सरकारने आश्वस्त केले आहे, असे सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका म्हणाले.
