तलाठी भरतीच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर, १०० गुणांचा पेपर आणि निगेटिव्ह मार्किंगसह ‘असा’ असेल परीक्षेचा अभ्यासक्रम!


मुंबईः महसूल आणि वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पदाची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व गट-क संयुक्त परीक्षेद्वारे होणार असून संयुक्त पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेद्वारे ही भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तलाठी भरतीच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला असून १०० गुणांच्या पेपर आणि निगेटिव्ह मार्किंग असे प्रश्नपत्रिकेचे स्वरुप आहे.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क’ परीक्षेत ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी पदाचा समावेश करण्यात येणार असून या परीक्षेमार्फत यंदा प्रथमच १ हजार ५३९ तलाठी पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत १०० गुणांची संयुक्त पूर्वपरीक्षा आणि ४०० गुणांची स्वतंत्र मुख्यपरीक्षा याद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

संयुक्त पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम असा

  1. इतिहासः आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
  2. भूगोलः महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या आणि उद्योगधंदे इत्यादी.
  3. अर्थव्यवस्थाः  भारतीय अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय निती इत्यादी मुद्यांवर प्रश्न आणि शासकीय अर्थव्यवस्थेत अर्थसंकल्प, लेखा व लेखापरीक्षण इत्यादी मुद्यांवर प्रश्न.
  4. चालू घडामोडीः महाराष्ट्रासह भारत तसेच जागतिक पातळीवरील महत्वाचा घडामोडी.
  5. राज्यशास्त्रः राज्यघटना आणि राज्य कारभाराशी संबंधित मूलभूत घटक.
  6. सामान्य विज्ञानः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र.
  7. अंकगणितः बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी मूलभूत घटक.
  8. बुद्धीमापन चाचणीः उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे कौशल्य अजमावण्यासाठीचे प्रश्न.

संयुक्त पूर्वपरीक्षेची रचना व गुणदान पद्धती

एकूण गुणः १००
प्रश्नांची संख्याः १००
परीक्षेचे स्वरुपः वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQs)
परीक्षेचे माध्यमः मराठी व इंग्रजी
परीक्षेचा कालावधीः १ तास (६० मिनिटेः
परीक्षेचा स्तरः पदवीस्तर

नकारात्मक गुणदान पद्धती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने तलाठी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क या परीक्षक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा १/४ गुण एकूण गुणांमधून वजा केले जातील. एकापेक्षा जास्त वर्तुळे रंगवल्यास ते उत्तर चुकीचे मानले जाईल. उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी मात्र नकारात्मक गुण पद्धती लागू होणार नाही.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!