अतुल सावेंना अजित पवार म्हणाले: सहा महिन्यातही तुम्ही रूळलाच नाहीत; काही काम आणले की देवेंद्रजींना विचारतो म्हणता!

नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात सहकारमंत्री अतुल सावे यांना लक्ष्य करत टिकास्त्र सोडले. राज्याच्या सहकारमंत्र्यांकडे काही काम घेऊन गेले की ते कायम फडणवीसांना विचारून सांगतो, असे उत्तर देतात, अशा शब्दांत अजित पवारांनी सावेंवर टीका केली. सहा महिने झाले तरी तुम्ही त्या खात्यात अजून रूळलाच नाहीत, असा टोलाही त्यांनी सावेंना लगावला.

नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक प्रचंड आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आक्रमकपणे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधक फ्रंटफूटवर आणि सत्ताधारी बॅकफूटवर असल्याचेच एकंदर चित्र पहायला मिळाले.

सहकाराच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी सहकारमंत्री अतुल सावेंना लक्ष्य केले. आपण सहकारमंत्री आहात. पूर्वी औरंगाबादचे विनायकराव पाटील यांनी सहकारमंत्रिपद फार चांगले भूषवले होते. पण अजून तुम्ही सहा महिन्यांमध्ये त्या खात्यात रूळलाच नाहीत. काही काम तुमच्याकडे आणले की देवेंद्रजींना विचरतो असे उत्तर देता. अरे, देवेंद्रजींकडे सहा खाती आहेत ना बाबा. अजून तुमच्या खात्याचा भार त्यांच्या डोक्यावर कशाला टाकता? ते कर्तृत्ववान असल्याने सहा पालकमंत्रिपद त्यांच्याकडे आहेत. पण त्यांनी सहा पालकमंत्री वेगळे नेमले तर काम जास्त चांगले होणार नाही का? असा प्रश्न अजित पवारांनी सरकारला विचारला.

आता मी अमृता वहिनींनाच येऊन सांगणार आहे… देवेंद्र फडणवीसांकडे सहा खाती आणि सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद असल्याचा मुद्दा उपस्थित करतानाच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याचेही अजित पवार म्हणाले. तुम्ही महिलांबद्दल सांगताय. भाजपला महिलांची मते मिळाली आहेत. सहा महिन्यात तुम्हाला मंत्री करायला एकही महिला सापडेना? अरे कुठला हा कारभार? असा उपरोधिक सवालही अजित पवारांनी केला. मी आता अमृता वहिनींनाच येऊन सांगणार आहे की जरा बघा यांच्याकडे. त्यांनी मनावर घेतले की लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे, असे अजित पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!