रोजगाराच्या अमाप संधी, व्यापक बाजारपेठेची ‘समृद्धी’ देणारा महामार्ग!


नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गापैकी नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त संपूर्ण राज्यासाठी ‘समृद्धी’चा महामार्ग ठरणा-या मार्गाविषयी हा लेख…

  • अतुल पांडे

कुठल्याही देशाचा दर्जेदार विकास साधण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणा-या गोष्टी म्हणजे रस्ते आणि शिक्षण आहेत हे जाणून राज्य शासनाने रस्ते आणि शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. ‘गतिमान रस्ते, गतिमान विकास’ हे विकाससूत्र ठरवून समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होय. संपूर्ण राज्याच्या विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याचा कायापालट करण्यास हा महामार्ग सक्षम ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून दूर राहिलेल्या भागाला समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई- विदर्भ- मराठवाडा भूभागातील अंतर दूर करणारा हा सर्वात जवळचा मार्ग ठरणार आहे. विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना मुंबई व मुंबईमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर आरामदायी व सुरक्षित पद्धतीने पार व्हावे, यासाठी प्रवेश नियंत्रण (Access controlled) असलेल्या शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाची आखणी करण्यात आली आहे. या महामार्गावर निर्माण होणारी शहरे, लॅाजिस्टिक हब यातून नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

………………………………………………………………

‘समृद्धी’ची वैशिष्ट्ये:एकूण ७०१ किलोमिटर लांबी व १२० मीटर रुंदीचा सहा पदरी द्रुतगती मार्ग.

-१० जिल्हे, २६ तालुके आणि आसपासच्या ३९२ गावांना जोडणार.

-नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त ८ तासांत पार करणे शक्य.

-प्रस्तावित वाहन वेग (डिझाईन स्पीड) ताशी १५० किमी.

-महामार्गालगत होणार १९ कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती.

-भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे ११ लाख ३१ हजार वृक्षांची होणार लागवड. –महामार्गाच्या प्रत्येकी पाच किमी अंतरावर असणार सीसीटीव्ही कॅमेरे.

-विनामूल्य दूरध्वनी सेवा. -महामार्गावरील बोगद्यात विद्युत रोषणाई, पूल सुशोभिकऱण, पथदिवे आणि डिजीटल संकेत (सिग्नल) यांचा वापर. -ठराविक ठिकाणी वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स.

-१३८ ।४७ मेगावॅट उर्जा निर्मिती करणारे सौर उर्जा प्रकल्प.

………………………………………………………………

विदर्भातील पाच जिल्ह्यांचा या समृद्धी महामार्गात समावेश करण्यात आला आहे. त्यात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे.  विदर्भातील अनेक तालुक्यांतून हा महामार्ग जाणार असून त्यामुळे हे तालुके या महामार्गाशी जोडले जाणार आहेत.

मोठी बाजारपेठ उपलब्ध होणारः शेतकऱ्यांना आपल्या शेतातील मालासाठी आता मुंबईची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे आणि तीही अवघ्या दहा तासांच्या आत. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बागवाडी या गावातील शेतक-याला आपला शेतातील संत्रा विकायचा असेल, तर तो आता थेट कारंजा मार्गे मुंबईला व तेथील बंदरामार्गे परदेशी सुद्धा पाठवू शकणार आहे. पूर्वी त्याला नागपूरशिवाय पर्याय नसायचा व तेवढा रास्त भावही मिळायचा नाही. शेतक-यांना आता समृद्धीमुळे हक्काचा बाजारभाव आणि बाजारपेठ मिळण्याची अडचण दूर होणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील भाग देशाच्या, जगाच्या नकाशावर येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतमालाची वाहतूक थेट बंदरापर्यंत करता येणार आहे. अनेक पर्यटनस्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळेल. लोणार, अजिंठा, वेरूळ लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबी का मकबरा इत्यादी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे देशाच्या व जगाच्या नकाशावर येतील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यासाठी ‘समृद्धी’चा महामार्ग ठरणारा आहे, एवढे निश्चित!

(लेखक नागपूच्या जिल्हा माहिती कार्यालयात माहिती अधिकारी आहेत.)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!