फोडाफोडी करून सोबत घेतलेल्या मित्रपक्षांमुळेच भाजपवर ‘अब की बार ४०० पार’च्या नाऱ्यावर पाणी सोडण्याची वेळ, असे आहे चित्र!

मुंबईः देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तिसऱ्या टप्प्यातील प्रचार काल थांबला. परंतु देशभरात फोडाफोडी करून सोबत घेतलेल्या मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली असून या मित्रपक्षांमुळेच भाजपला ‘अब की बार, ४०० पार’च्या नाऱ्यावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. बहुतांश सर्वेक्षणातून भाजपने सोबत घेतलेल्या मित्रपक्षांची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्यामुळे भाजप नेतृत्वाची चिंता वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात उद्या (७ मे रोजी) मतदान होणार आहे. यापैकी बहुतांश जागा या पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजेच साखरपट्ट्यातील आहेत. या साखरपट्ट्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. साखरपट्ट्यातील कोल्हापूर, हातकणंगले या महत्वाच्या मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. या साखरपट्ट्यात कोणाच्या तोंडात साखर पडणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी भाजप पहिल्यांदाच २८ जागा लढवत आहे तर २० जागांवर मित्रपक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिंदेची शिवसेना १५, अजित पवारांची राष्ट्रवादी ४ तर राष्ट्रीय समाज पक्ष एका जागेवर निवडणूक लढवत आहे. मात्र या मित्रपक्षांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे भाजप नेतृत्वाला वाटते.

महाराष्ट्रात भाजपने मिशन ४५ ची योजना आखली असली तरी बहुतांश सर्वेक्षणाचे अहवाल पाहता भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करून जिंकलेल्या ४१ जागांपैकी अर्ध्या जागाही जिंकता येणार नाहीत, अशी एकंदर परिस्थिती आहे.

राज्यात महायुतीला १९ ते २२ जागा मिळतील, असा बहुतांश सर्वेक्षणाचा ठोकताळा आहे. यातील बहुतांश जागा भाजप जिंकणार असल्याचे हे सर्वेक्षण अहवाल सांगतात. राज्यात भाजपला यश मिळेल परंतु मित्रपक्षांना फारसे यश मिळणार नाही, असे सर्वेक्षणाचे अंदाज असल्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे.

देशभरातही मित्रपक्षांमुळे भाजपची अडचणी झालेली दिसते. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये ४० पक्ष आहेत. ते १०० जागा लढवत आहेत. कर्नाटकमध्ये प्रज्वल रेवण्णा याचे सेक्स स्कँडल उघडकीस आल्यामुळे एच.डी. देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर पक्ष भाजपसाठी अडचणीचा ठरला आहे. २०१९ मध्ये भाजपने कर्नाटकातील २५ जागा जिंकल्या होत्या. परंतु निवडणूक ऐनभरात असताना प्रज्वल रेवण्णाचे सेक्स स्कँडल बाहेर आल्यामुळे भाजपला मागील कामगिरीची पुनरावृत्ती करणे अवघड दिसत आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. २०१९ मध्ये भाजपने उत्तर प्रदेशात ६४ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपने तेथे मित्रपक्षांना ६ जागा सोडल्या आहेत. परंतु तेथे योगी सरकारविरुद्धच्या रोषामुळे मागील निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार का? याची धाकधूक भाजपला आहे.

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. त्यापैकी २३ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही महिनेआधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मारलेल्या राजकीय कोलांटउड्यामुळे बिहारी मतदारांत रोष आहे. त्यामुळे जदयू लढत असलेल्या १६ जागांपैकी अनेक जागा अडचणीत आहेत. त्यातच बिहारमधील एनडीएचे मित्रपक्ष एकत्रितपणे प्रचारही करताना दिसत नाहीत.

लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे एनडीएत घटक पक्ष असूनही नितीश कुमार- चिराग पासवान हे या निवडणुकीत एकमेकांपासून फटकून वागताना दिसत आहेत. त्याचाही फटका भाजपला या निवडणुकीत बसणार आहे.

तामिळनाडू-केरळमध्ये भाजप आठ छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरा जात आहे. यंदा या दोन राज्यांत किमान खाते तरी उघडेल असा आशावाद भाजपला आहे. परंतु दाक्षिणात्य मतदारांमधील भाजपविरोधातील रोष लपून राहिलेला नाही.

आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ जागांपैकी बहुतांश जागा जिंकण्याचा भाजपला विश्वास आहे. चंद्राबाबू नायडूंना सोबत घेतल्यामुळे भाजपचा विश्वास दुणावला असला तरी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांची जादू ओसरलेली दिसते.

 तेलंगणमध्ये भाजपची स्थिती म्हणावी तशी भक्कम दिसत नाही. त्यामुळे ४०० पार करण्यासाठी सोबत घेतलेल्या मित्रपक्षांमुळेच भाजपच्या या मनसुब्यावर पाणी फेरले जात असताना दिसू लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!