राज्याचे लक्ष बारामतीकडे, पवार विरुद्ध पवार लढतीची उत्सुकता; महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

मुंबईः  देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज मंगळवारी मतदान होत असून दिग्गज नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात होत असलेल्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बारामतीबरोबरच राज्यात अन्य ११ लोकसभा मतदारसंघातही आज मतदान होत असून या मतदारसंघांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत २३ लाख ७२ हजार मतदार आहेत. यंदा या मतदारसंघात शरद पवारांसमोर घरातूनच कडवे आव्हान उभे राहिले आहे. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून तीनवेळा विजयी झाल्या आहेत. परंतु यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे पहिल्या दिवसापासून पवार विरुद्ध पवार लढतीबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांनी लेकीच्या विजयासाठी संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढला आहे. अजित पवार यांनीही पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी जुन्या वादांना पूर्णविराम देऊन विजयासाठी नवी समीकरणे जोडली आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पवार विरुद्ध पवार लढतीत बारामतीचे मतदार कोणत्या पवारांच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

११ मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान होत आहे. सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बारामतीबरोबरच या ११ पैकी बहुतांश मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सोलापूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुशीलकुमार शिंदे यांचा या मतदारसंघात सलग दोनवेळा पराभव झाले आहे. प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध भाजपचे राम सातपुते रिंगणात आहेत.

 कोल्हापूरमध्ये प्रथमच छत्रपती घराण्यातील उमेदवार असल्यामुळे त्याविषयीही राज्यभर आकर्षण आहे. कोल्हापुरातून काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या पुढे शिंदे शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचे आव्हान आहे.

गेली २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला सातारा लोकसभा मतदारसंघ यंदा शरद पवारांना साथ देतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. साताऱ्यात भाजपने खा. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे.

माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लक्षवेधी लढत होत आहे. लातूरमध्ये भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्याविरुद्ध काँग्रेसने शिवाजीराव कोळगे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने गेल्या दोन निवडणुकात लातूरमध्ये विजय मिळवलेला आहे. काँग्रेस उमेदवार कोळगे हे माला जंगम समुदायातील आहेत. लातूरमध्ये मोठ्या संख्येने लिंयागत मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मोदींचा करिश्मा कितपत चालतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हातकणंगलेमध्ये शिंदे सेनेचे धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि ठाकरे सेनेचे सत्यजीत पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात धैर्यशील माने यांच्याविषयी मतदारांत प्रचंड नाराजी आहे.

रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि ठाकरे शिवसेनेचे अनंत गीते यांच्या काट्याची लढत होत आहे. उस्मानाबादमध्ये ठाकरे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील नशीब अजमावत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!