लखनऊः लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजप आणि मोदीविरुद्ध प्रचंड रोष दिसू लागला असून त्यामुळे पराभवाच्या चिंतेने ग्रासलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता मतदारांनाच घाबरवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीवाले सत्तेत आले तर अयोध्येतील राम मंदिर बुलडोझर लावून पाडून टाकतील, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे हे सांगताना त्यांनी कुठलाही पुरावा दिला नाही. मोदींचे हे वक्तव्य त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे द्योतक मानले जात आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी आणि हमीरपूरमध्ये शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन प्रचारसभा घेतल्या. या दोन्ही सभांमध्ये त्यांनी काँग्रेस आणि सपाबाबत मतदारांना घाबरवण्याचा सर्वशक्तीनिशी प्रयत्न केला. ‘काँग्रेस आणि सपावाले जर सत्तेत आले तर रामलल्ला पुन्हा तंबूत पाठवतील आणि मंदिरावर बुलडोझर चालवतील. योगींकडून हेच शिकायचे काय? अरे बुलडोझर कुठे चालवायचा आणि कुठे चालवायचा नाही, याबाबत योगींकडून जरा ट्यूशन घ्या’, असे प्रधानमंत्री मोदी बाराबंकी येथील प्रचारसभेत म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी काँग्रेस आणि सपावर अयोध्येतील राम मंदिर बुलडोझरने पाडण्याचा आरोप कशाच्या आधारावर केला आहे, हे कुणालाही माहीत नाही. त्यांनी आपल्या एखाद्या केंद्रीय एजन्सीच्या कोणत्याही अहवालाचा याबाबत दाखल दिला नाही. केवळ कल्पनेच्या आधारावर हे वक्तव्य करत मोदी पुढे म्हणाले, ‘काँग्रेस राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पलटवण्याची तयारी करत आहे. काही लोक म्हणतात की असे कसे होऊ शकते? भ्रमात राहू नका. देश जेव्हा स्वातंत्र्य लढा लढत होता आणि देशाचे तुकडे करण्याबाबत बोलले जायचे तर देशातील प्रत्येक नागरिक म्हणत होता की, नाही यार देशाचे तुकडे कुठे होत असतात. झाले की नाही झाले? त्यांनी केले की नाही केले? ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांचा ट्रॅक रेकॉर्डच असा आहे. त्यांच्यासाठी देशवेश काहीच नाही भाई,’ असेही मोदी म्हणाले.
‘या लोकांनी आपल्या वोट बँकेला खुश करण्यासाठी सर्वात आधी रामलल्लाला तंबूत ठेवले. हे लोक म्हणाले की, तेथे मंदिराऐवजी धर्मशाळा, शाळा किंवा रुग्णालय बांधा. आता मंदिर तयार झाल्यामुळे त्यांच्या पोटात असे विष भरले- रामल्लाशी त्यांची काय दुश्मनी आहे, हे मला माहीत नाही- त्यांनी अभिषेकाचे निमंत्रण नाकारले. राम मंदिर बेकार आहे, असे सपाचा एक बडा नेता रामनवमीच्या दिवशीच म्हणाला. मी तुम्हा लोकांना सांगतो की, त्यांना मत देणे तर दूरच, तुम्ही त्यांना अशी सजा दिली पाहिजे की, त्यांची जमानत जप्त झाली पाहिजे, असे प्रधानमंत्री मोदी म्हणाले.
हमीरपूर येथील सभेतही मोदींनी मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. ‘जर काँग्रेस आणि सपा सत्तेत आले तर ते एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण हिसकावून घेतील आणि आपल्या वोट बँकेत वाटून टाकतील. हे लोक वोट जिहाद करतील’, असेही मोदी म्हणाले. मोदींची ही भाषणे जातीयवादी असल्याची टिका काँग्रेस आणि सपाने केली आहे. अनेक तक्रारी करूनही निवडणूक आयोगाने अद्याप मोदींच्या जातीयवादी भाषणांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींची भाषणे इतकी कडवट नव्हती.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ‘टीव्ही १८’ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी ‘मी ज्या दिवशी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी सार्वजनिक जीवनात राहण्याच्या लायक असणार नाही. मी हिंदू-मुसलमान करणार नाही, हा माझा संकल्प आहे,’ असे म्हटले होते. मुलाखतीत आदर्शवादी गप्पा ठोकणाऱ्या मोदींनी शुक्रवारी मात्र बाराबंकी आणि हमीरपूर येथील प्रचारसभांमध्ये केलेली वक्तव्य मात्र अगदीच विपरित आहेत. मोदींच्या या दुटप्पीपणाचा मतदारांवर काय परिणाम होत आहे, हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.