दारू घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक, केजरीवालांना धक्का


नवी दिल्लीः दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळाप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली.

आज, रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी मनीष सिसोदिया हे चौकशीसाठी सीबीआयच्या कार्यालयात हजर झाले होते. नऊ तास चाललेल्या चौकशीत सीबीआयने सिसोदिया यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली. सिसोदिया यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. आपल्या अटकेची शक्यता असल्याचे सिसोदिया यांनी आधीच म्हटले होते. सात ते आठ महिन्यांसाठी तुरूंगात जाण्याची आपली तयारी असल्याचे सांगत त्यांनी मोदी सरकारवर टिकास्त्रही सोडले होते.

सीबीआयने या आधी सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. परंतु अर्थसंकल्पाच्या तयारीचे कारण देत त्यांनी ही चौकशी पुढे ढकलण्याची विनंती सीबीआयला केली होती. त्यानुसार सीबीआयने आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

मनीष सिसोदिया हे चौकशीसाठी हजर झाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी सीबीआय कार्यालय आणि सिसोदिया यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. सिसोदिया हे चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात गेल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यावेळी पोलिसांनी खासदार संजय सिंह यांच्यासह आपच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

 गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या नव्या धोरणामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल आणि मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला होता. या नव्या धोरणांतर्गत दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी दुकाने बंद करून नवीन निविदा जारी करण्यात आल्या होत्या.

हे धोरण येण्याआधी दिल्लीत दारूची ७२० दुकाने होती. त्यापैकी २६० दुकाने खासगी होती. नवीन धोरणानंतर सर्व दारू दुकाने खासगी व्यावसायिकांच्या ताब्यात गेली. त्यावर दिल्लीच्या उपराज्यपालांनी आक्षेप घेतला होता आणि सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. हे धोरण राबवताना गैरव्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर हे धोरण मागे घेण्यात आले होते.

 सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात ७ आरोपींची नावे आहेत. मात्र त्यात मनीष सिसोदिया यांचे नाव नाही. दलाल, व्यापारी, नोकरशहा आणि नेत्यांच्या दक्षिण लॉबीसंबंधित मनीष सिसोदियाकडून सीबीआयला माहिती हवी आहे. त्यांच्या अटकेमुळे राजधानी दिल्लीतील राजकारण आणखी तापणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!