राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी ‘लाभा’साठी मतदान कक्षात केली पूजाअर्चा, धार्मिक अवडंबराला अधिकाऱ्यांचीही खुली संमती!

मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज भर मतदान केंद्रावर धार्मिक अवडंबर माजवत मतदान कक्षाची पूजाअर्चा केली. रूपाली चाकणकरांची ही कृती हिंदू मतदारांवर प्रभाव टाकण्यास सहाय्यभूत ठरणारी असताना आणि निवडणूक आचारसंहितेत कोणत्याही प्रकारचे धार्मिक अवडंबर माजवण्यास मनाई असतानाही मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिलीच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या धर्मनिरपेक्ष भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज मंगळवारी सकाळी सुरूवात झाली. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघांसह ११ लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे.

बारामती मतदारसंघात मतदानाला प्रारंभ होण्यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या एका मतदान केंद्रावर पोहोचल्या. मतदानाला सुरूवात होण्यापूर्वी त्यांनी मतदान कक्षात विधिवत पूजाअर्चा केली. आठ-दहा पुरूष व महिला कार्यकर्त्यांचा घोळका घेऊन चाकणकर या मतदान केंद्रात घुसल्या असताना त्यांना कोणीही रोखले नाही. त्यामुळे मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना पूजाअर्चा करण्याची खुली परवानगीच दिली होती की काय? अशी शंका घेतली जाऊ लागली आहे.

रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्याचबरोबर त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या स्टारप्रचारकही आहेत. असे असतानाही मतदान केंद्रावर येऊन चाकणकर यांना धार्मिक अवडंबर माजवण्यास परवानगी देण्यात आलीच कशी? असा सवाल केला जात आहे. रुपाली चाकणकर यांची ही कृती सुनेत्रा पवार यांच्यासाठी हिंदू मतदारांवर प्रभाव टाकणारी असल्याची टिकाही होत आहे.

मतदान केंद्रावर जाऊन मतदान कक्षाची पूजाअर्चा केल्याबाबतची खुद्द रुपाली चाकणकर यांनीच एक्सवर फोटे शेअर करून दिली आहे. त्यांनी नेमके कोणत्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान कक्षाची पूजाअर्चा केली, याचा तपशील दिलेला नाही. मात्र ‘लोकशाहीचा उत्सव अर्थात मतदान. आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने मतदान कक्षाचे पूजन केले. आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करावे. यावेळी इतर मान्यवर तसेच मतदान अधिकारी उपस्थित होते,’ अशी माहिती देत चाकणकर यांनी काही फोटो शेअर केले आहेत. परंतु तासाभरानंतर चाकणकर यांनी ही पोस्ट डिलिट करून टाकली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी मतदान केंद्रावर जाऊन आज पूजाअर्चा केली. पूजाअर्चा केल्यानंतर एक्सवर माहिती देत स्वतःच फोटो शेअर केले. मात्र वाद निर्माण होताच ही पोस्ट त्यांनी डिलिट करून टाकली आहे.

अधिकारी कोण? पदाधिकारी कोण?

रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवर मतदान कक्षातील पूजाअर्चेचे दोन फोटो शेअर केले होते. त्यातील एक फोटो त्या स्वतः पूजाअर्चा करतानाच होता तर दुसरा समूह फोटो होता. या फोटोत चाकणकर यांच्यासह नऊ जण दिसत आहेत. त्या छायाचित्रात दिसणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कोण? आणि मतदान अधिकारी कोण? यांची ओळख पटवून निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

… मग नमाज पडू देणार का?

उमेदवार आणि त्यांच्या प्रचारकांना त्यांच्या धर्माचे वैयक्तिक पातळीवर पालन करण्याची मुभा असली तरी निवडणूक नियम आणि आचारसंहितेप्रमाणे कोणालाही प्रत्यक्ष निवडणुकीत धार्म, धार्मिक भावनांचा लाभासाठी वापर करण्यास परवानगी नाही. रुपाली चाकणकर यांनी तर थेट मतदान केंद्रात जाऊन हिंदू धर्माच्या रिवाजाप्रमाणे मतदान कक्षाचे पूजन केले आहे. हे निवडणुकीचे नियम आणि निवडणूक आचारसंहितेचे उघड उघड उल्लंघन असून आता निवडणूक आयोग रुपाली चाकणकरांबरोबरच त्यांना मतदान कक्षात पूजन करण्याची परवानगी देणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांविरुद्ध काय कारवाई करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उद्या जर एखादा मुस्लिम राजकीय नेता मतदान कक्षात येऊन नमाज पडणार असेल, ख्रिश्चन नेता बायबलचे पठण करणार असेल किंवा बौद्ध समाजाचा नेता त्रिशरण पंचशील म्हणू पहात असेल तर त्याला निवडणूक आयोग आणि मतदान अधिकारी अशीच परवानगी देणार का? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!