पुणेः बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरूवात होण्यापूर्वी थेट मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीनची पूजाअर्चा केल्याप्रकरणी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात पुण्याच्या सिंहगड पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूजटाऊनने आज सकाळीच या संदर्भातील वृत्त दिले होते.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज सकाळी मतदान केंद्रावर मतदान सुरू असतानाच तेथे जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, स्टारप्रचारक आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काही कार्यकर्त्यांसह मतदान कक्षातील ईव्हीएम मशीनची पूजाअर्चा केली होती.
या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. मतदान केंद्रात जाऊन धार्मिक अवडंबर माजवण्याच्या त्यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आणि विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले. हा वाद सुरू असतानाच आता पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला परिसरात रुपाली चाकणकर राहतात. आज सकाळी रुपाली चाकणकर या आरतीचे ताट घेऊनच खडकवासला परिसरातील मतदान केंद्रावर पोहोचल्या आणि त्यांनी थेट मतदान कक्षात ईव्हीएम मशीनची पूजाअर्चा केली. त्यांनी तेथे फोटो सेशनही केले. त्यावेळी त्यांच्यासोबत मतदान केंद्रातील अधिकारीही होते.
पूजाअर्चा करून झाल्यावर चाकणकर यांनी एक्स (ट्विटर) हॅण्डलवर पोस्ट करत आपण मतदान कक्षात जाऊन ईव्हीएम मशीनचे पूजन केल्याचे सांगत फोटोही शेअर केले होते. तसेच ही पूजाअर्चा सुरू असताना पदाधिकारी आणि मतदान अधिकारी उपस्थित होते, असेही चाकणकर यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. नंतर वाद निर्माण झाल्यानंतर चाकणकर यांनी ही पोस्ट डिलिट करून टाकली खरी, परंतु वाद काही शमला नाही.
आता याप्रकरणी पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात रुपाली चाकणरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा करत आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ अशी माहिती पुणे शहर पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
‘चाकणकरांना वेड्यांच्या दवाखान्यात भरती करा‘
चाकणकारांच्या ईव्हीएम पूजाअर्चा प्रकरणावरून महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी चाकणकरांवर टिकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ज्या पद्धतीने ईव्हीएम मशीनची पूजा केली, त्यांचे अशा पद्धतीचे वागणे हे वेड्यासारखे आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार केले पाहिजे, असे सव्वालाखे म्हणाल्या.
गेल्यावेळी चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयातूनच पक्षाचा प्रचार केला होता. तेव्हा त्यांची कीव आली होती. त्यावेळी असे वाटले होते की, त्या असे कृत्य कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा दडपणाखाली करत असतील. पण आजचे त्यांचे कृत्य म्हणजे खरेच त्यांच्या डोक्यात फरक पडल्याचे लक्षण असून ते पुरोगामी महाराष्ट्राला न शोभण्यासारखे आहे, असा हल्लाबोलही सव्वालाखे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांच्या कृत्याची तत्काळ दखल घेऊन त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी. नाहीतर भविष्यात राज्य महिला आयोगाकडे एखादी महिला गेली तर तिला न्याय मिळणार नाही, असेही सव्वालाखे यांनी म्हटले आहे.