छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांना अवघ्या ४८ तासांतच या पदावरून दूर करण्याचा धक्कादायक निर्णय कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी घेतला आहे. डॉ. फुलारी यांनी स्वतःच डॉ. सरवदे यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयावरील शाई वाळण्याच्या आतच त्यांनी या पदावरून डॉ. सरवदे यांना हटवण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्यामुळे सगळेच अवाक झाले आहेत. त्यामुळे डॉ. फुलारी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरण्याचे संकेतच या निर्णयातून मिळाले आहेत.
डॉ. विजय फुलारी यांनी २४ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतली. कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या प्र-कुलगुरू आणि चार अधिष्ठातांच्या तात्पुरत्या नियुक्त्या केल्या होत्या. हा निर्णय त्यांनी २९ जानेवारी रोजी घेतला होता.
कुलगुरूंच्या या निर्णयाचे आदेश प्राप्त होताच त्याच दिवशी म्हणजे २९ जानेवारी रोजी सायंकाळी प्र-कुलगुरू डॉ. सरवदे यांच्यासह विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.डी. शिरसाठ, आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली खापर्डे, मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. वीणा हुंबे यांनी पदभार स्वीकारला होता.
प्र-कुलगुरू डॉ. सरवदे यांनी ३० जानेवारी आणि ३१ जानेवारी असे दोनच दिवस पूर्णवेळ काम केले आणि आज सकाळीच आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यामार्फत त्यांना प्र-कुलगुरूपदावरून हटवण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. कुलगुरू डॉ. फुलारी हे कालपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. काल ते मुंबईत पोहोचले आणि आज मुंबईतूनच त्यांनी डॉ. सरवदे यांना प्र-कुलगुरूपदावरून हटवण्याचा आदेश काढण्याचे निर्देश प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांना दिला. त्यामुळे मुंबईत तर याबाबतची खलबते झाली नाहीत ना? अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंबंधीच्या टिप्पणीला कुलगुरूंकडून व्हॉट्सअपवर मान्यता घेण्यात आली आणि त्यानंतर हे आदेश काढण्यात आले. सकाळीच हे आदेश डॉ. सरवदे यांच्याकडे पोहोचते करण्यात आले. कुलगुरूंच्या या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
ही चोपडे युगाची सुरूवात?
यापूर्वी डॉ. बी.ए. चोपडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असताना ‘नेमणे आणि तडकाफडकी काढणे’ अशी मालिकाच सुरू झाली होती. डॉ. चोपडे हे गरजेनुसार एखाद्या पदावर एखाद्या प्राध्यापकाची नियुक्ती करायचे आणि कुणाचा दबाव आला की ती नियुक्ती तडकाफडकी मागे घ्यायचे. पण त्यांनी हे ‘युग’ पदभार घेतल्यानंतर दीड वर्षांच्या कालावधीनंतर सुरू केले होते. डॉ. फुलारी यांनी कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेऊन आठवडाच उलटला असताना त्यांनीच केलेली नियुक्ती त्यांनीच तडकाफडकी रद्द केली आहे.
संघर्षाची ठिणगी?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ही चळवळीची भूमी आहे. येथे दलित चळवळी ताकदीने काम करतात, तशा अन्य चळवळीही काम करतात. त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने हे शहर अत्यंत संवेदनशील मानले जाते. त्यामुळे डॉ. सरवदे यांची प्र-कुलगुरूपदावर नियुक्ती आणि ज्या पद्धतीने त्यांना तडकाफडकी या पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे डॉ. फुलारींच्या कार्यकाळाचा पहिला आठवडा संपण्याच्या आतच संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.