
हिमायतनगर: शाळेतून घरी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिच्यावर लैंगिक हल्ला केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील सराईत गावगुंड धम्मपाल राजू येरेकारविरूद्ध हिमायतनगर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली आहे. महिला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे सध्या राज्याचे वातावरण तापलेले असतानाच बाल लैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झाल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, गावातील महिला-पुरूषांनी आरोपी धम्मपालला गावातून कायमस्वरुपी हद्दपार करण्याची मागणी गृहमंत्री आणि नांदेडच्या पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
सिरंजनी येथील सराईत गावगुंड धम्मपाल राजू येरेकार याच्या विरोधात घरात घुसून एकट्या दुकट्या महिलेचा विनयभंग करून धमकावणे, रस्त्याने जाणाऱ्या महिला-पुरूषांवर दगडफेक-मारहाण करणे असे अनेक गुन्हे हिमायतनगर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सिरंजनीतील नागरिकांत प्रचंड दहशत पसरली आहे. अशातच त्याने एका आठ वर्षीय शाळकरी मुलीला रसत्यात अडवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
सिरंजनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीला शिकणारी आठ वर्षीय मुलगी सोमवारी (३ मार्च) शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना धम्मपाल राजू येरेकार या गावगुंडाने तिला अडवले. त्याने तिच्या अंगावर हात टाकून तिची पॅन्ट काढली आणि तिच्या पार्श्वभागावर हात फिरवत अश्लील चाळे करू लागला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या पीडित शाळकरी मुलीने आरडाओरड सुरू केली.
पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून याच शाळेत इयत्ता सातवीला शिकणारी तिची १२ वर्षीय मोठी बहीण धावत आली. धम्मपाल राजू येरेकारच्या तावडीतून लहान बहिणीची सुटका करण्याचा तिने प्रयत्न केला असता त्याने तिलाही दमदाटी करून धमकावले. या दोघींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावातील काही लोक धावत येत असल्याचे पाहून धम्मपाल येरेकारने पळ काढला.
घाबरलेल्या अवस्थेत या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींनी घरी पोहोचल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यांच्या आईने मंगळवारी हिमायतनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. आईच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिसांनी धम्मपाल राजू येरेकारच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ७४ आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या (पोक्सो) कलम १० व १२ अन्वये गुन्हा दाखल करून बुधवारी त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक अमोल भगत हे पुढील तपास करत आहेत.
आरोपीविरुद्ध दहा दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा
धम्मपाल राजू येरेकार हा सराईत गुंड असून २४ फेब्रुवारी रोजी सिरंजनी येथीलच एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३३, ११५ (२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी धम्मपाल राजू येरेकारला फक्त समज देऊन सोडून दिले होते. त्यानंतर आता त्याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धम्मपालच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सिरंजनी गावातील महिला-मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून अनेक महिलांनी कामासाठी शेतावर जाणेही बंद केले आहे.
गावगुंड धम्मपालला कायमस्वरुपी हद्दपार करा
धम्मपाल राजू येरेकार याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सिरंजनी गावातील सामाजिक शांतता धोक्यात आली असून महिला-मुलींबरोबरच नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे धम्मपाल येरेकारला गावातून कायमस्वरुपी हद्दपार करा, अशी मागणी सिरंजनी गावातील महिला-पुरूषांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेडच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धम्मपाल राजू येरेकार या गावगुंडाने गावात गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रचंड दहशत निर्माण केली आहे. घरात एकटी असलेल्या महिलेच्या अंगावर हात टाकणे, रस्त्याने जाणाऱ्या महिला-मुलींची छेड काढणे, कोणाच्याही घरावर रात्री-बेरात्री हल्ला करणे, कोणतेही कारण नसताना महिला, पुरूष आणि मुलींच्या अंगावर दगड भिरकावून हल्ला करणे अशा कारवाया तो सातत्याने करत असल्यामुळे गावातील महिला-मुलींना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे गावगुंड धम्मपाल येरेकारचा सिरंजनी गावातून कायमस्वरुपी हद्दपार करून गावकऱ्यांची त्याच्या दहशतीतून मुक्तता करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर ४२ महिला-पुरूषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

