सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतलेः शिंदे गटाचे विजय शिवतारे यांचा आरोप


 पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतले, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबुक पोस्ट करून सुप्रिया सुळे यांच्यावर हा आरोप केल्यामुळे सुळे या नवीन वादात सापडण्याची आणि हा राजकीय वाद तापण्याची शक्यता दिसू लागली आहे.

 सुप्रिया सुळे यांनी शनिवारी एका हॉटेलात मटण खाऊन नंतर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले, असे शिवतारे यांनी म्हटले आहे. शिवतारे यांनी फेसबुकवर सुप्रिया सुळे यांचा हॉटेलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुप्रिया सुळे ‘मी हीच थाळी खाल्ली’ असे म्हणताना दिसत आहेत. या हॉटेलमध्ये मटण खाल्ल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा फोटोही शिवतारे यांनी शेअर केला आहे.

आधी मटण खाल्ले. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला, असे शिवतारे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिवतारे यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर टिका केली जात आहे. नॉनव्हेज खाऊन जाणं बरोबर नाही. संत सोपानकाका कधीच माफ करणार नाहीत, अशी टिका केली जात आहे. तर काही जणांनी शिवतारे यांनाही लक्ष्य केले आहे. विजय शिवतारे साहेब त्यांचे पण चुकीचे आहे म्हणा असे नॉनव्हेज खाऊन देवदर्शन करणे चुकीचे आहे. पण तुम्ही ही पोस्ट टाकल्यामुळे परत दादांनी तुम्हाला विधानसभेला पाडू नये म्हणजे झाले, अशी खोचक टिका एकाने केली आहे.

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट केलेला हाच तो व्हिडीओ.

माझा फार अभ्यास कमी-सुळेः तुम्ही मटण खाऊन देवळात गेलात, यावरून टीका सुरू असल्याचे आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा या विषयावर अभ्यास फार कमी आहे. तुम्ही महागाई, अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि पाण्याच्या समस्येविषयी प्रश्न विचारले तर मी त्यावर काही बोलू शकेन, असे म्हणत सुळे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे या पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये प्रमोशनसाठी गेल्या होत्या, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!