मुंबईत ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १ हजार ८६५ तक्रारी; ७३९ परवाने निलंबित


मुंबई: ऑटोरीक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध आतापर्यंत १ हजार ८६५ तक्रारी प्राप्त झाल्या असून दोषी आढळलेल्या ७३९ परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

मुंबईत ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या संदर्भातील तक्रार आता व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येते. त्यासाठी ९१५२२४०३०३ क्रमांक व mh03autotaxicomplaint@gmail.com  ईमेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे.

व्हॉट्सॲप व ईमेल आयडीवर ११ जुलै २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत १ हजार ८६५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित कार्यालयाशी निगडीत ७९० तक्रारी आहेत. त्यापैकी ६७२ तक्रारी या ऑटोरिक्षा व ११८ तक्रारी या टॅक्सी सेवे संबंधित आहेत.

तक्रारींमध्ये ५८८ तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, ५९ तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाडयापेक्षा जादा भाडे आकारणे व १४३ तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तन करणे याबाबत प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे ७९० परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.

दोषी आढळलेल्या एकूण ७३९ परवानाधारकांचे परवाना निलंबित करण्यात आले आहे. यापैकी ५५७ परवानाधारकांचे ठोस कारणांशिवाय भाडे नाकारणे या कारणासाठी परवाने १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

या कारवाईत ६६ वाहनधारकांकडून १ लाख ६३ हजार ५०० रूपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. तसेच १२८ परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणे, ५४ परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या भाडयापेक्षा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाने १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमध्ये एकूण ९६ प्रकरणात २ लाख ३७ हजार रूपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.

३७ तक्रारींबाबत तक्रारदारांनी चुकीची तक्रार नोंद केल्याबाबत तक्रारदारांना अवगत केले आहे. तसेच सद्यस्थितीत परवाना निलंबित करण्यात आलेल्या ६४३ वाहनांची वाहन ४.० प्रणालीवर ‘नॉट टू बी ट्रान्सक्टेड’ नोंद (पाहिजे नोंद) घेण्यात आली आहे. कारवाईच्या माहितीबाबत तक्रारदारांना व्हॉट्सॲप व ई-मेल आयडीवर या माध्यमांतून अवगत करण्यात आले आहे.

प्रवासी नागरिकांनी संबंधित कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींची कार्यालयाकडून गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे, याबाबत प्रवाशांनी आश्वस्त रहावे.  परवानाधारकांनी नागरिकांना चांगली सेवा द्यावी आणि नागरिकांशी गैरवर्तन करू नये, असे आवाहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

खोटी तक्रार दाखल करणे हा भारतीय दंड विधान कलम १९२, १९३, १९९ व २०० अंतर्गत दंडनीय अपराध आहे. या कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवासी तक्रार मदत कक्षाला नागरिक उत्तमप्रकारे प्रतिसाद देत आहेत.

नागरिकांना ऑटोरिक्षा/टॅक्सी चालकांकडून गैरवर्तन भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणे आदी तक्रारी असतील, तर ९१५२२४०३०३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आणि mh03autotaxicomplaint@gmail.com या ईमेल आयडीवर योग्य त्या पुराव्यासह तक्रार दाखल करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!