वैद्यकीय व आरोग्य सेवा पदभरतीसाठी बीएएमएस उमेदवारांची परीक्षा होणार, परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरणार


मुंबई:  महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट- अ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले  आहेत. या पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांची परीक्षा होणार आहे.

अर्ज सादर करण्याची मुदत १ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीपर्यंत होती. या मुदतीअंती २२  हजार ९८१ बीएएमएसअर्हताधारक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. २८३  रिक्त पदे भरावयाची आहेत.

ही पदे परीक्षेद्वारे भरण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, वेळापत्रक, स्वरूप व इतर माहिती नंतर कळवण्यात येणार आहे, असे आरोग्य सेवा आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळवले आहे.

परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरणार

परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील शुश्रूषा, शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील तसेच प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

परिचारीका संघटनांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मुश्रीफ यांनी परिचारिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, उपसचिव वैशाली सुळे तसेच परिचारिका संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मेट्रन तसेच परिचारिकांच्या रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी. परिचारिकांना शुश्रूषा अधिकारी पदनाम देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गातील काम देऊ नये तसेच, रिक्त लिपिक पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असे मुश्रीफ म्हणाले.

 वैद्यकीय महाविद्यालयात पाळणाघर असणे अत्यावश्यक आहे. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबत कार्यवाही सुरू असून, नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानात या कर्मचाऱ्यांना सोयी देण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

सहसंचालक पद निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावा, केंद्राप्रमाणे नर्सिंग भत्ते, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत देय असलेला भत्ता, गणवेश भत्ता मिळण्यासंदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही मुश्रीफ यांनी दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!