संभाजीराजे छत्रपती काँग्रेसच्या वाटेवर; कोल्हापुरातून लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द, पण घातली ‘ही’ अट…


मुंबईः  मागच्या वेळी राज्यसभेची संधी हुकल्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवून संसदेत जाण्यास इच्छूक असलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यांनी मुंबईत काही नेत्यांशी चर्चाही केली असून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना कोल्हापुरातून उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आल्याचे सांगण्यात येते. याचबरोबच काँग्रेसने संभाजीराजेंना त्यांच्यास्वराज संघटनेचे विलिनीकरण करण्याची अटही घातल्याचे सांगण्यात येते.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. ज्याच्याकडे सक्षम उमेदवार त्याला ही जागा असे धोरण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्वीकारले आहे. सध्या या तिन्ही पक्षांकडे कोल्हापुरात सक्षम उमेदवार नसल्यामुळे उमेदवाराचा शोध सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारीसाठी गळ घालून पाहिली, परंतु त्यांनी नकार दिल्यानंतर आता संभाजीराजेंच्या बाबतीत हालचाली सुरू झाल्या आहेत.

छत्रपती शाही महाराजांच्या घराण्याचा वारसा असलेल्या कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांना २०१६ मध्ये भाजपच्या कोट्यातून राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती. २०२२ मध्ये त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली नाही. त्यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याबाबत चाचपणी करून पाहिली. शिवसेनेत प्रवेश केल्यास राज्यसभेची उमेदवारी देण्याची तयारी त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवली होती. पण तेव्हा संभाजीराजेंनी नकार दिला होता.

राज्यसभेची संधी हुकल्यामुळे संभाजीराजे आता लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यांच्या स्वराज संघटनेचा महाविकास आघाडीत समावेश करून आघाडीची उमेदवारी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी मुंबईत काही नेत्यांच्या भेटी घेतल्या. पक्षात प्रवेश करा, मगच उमेदवारीचा विचार करू, असा शब्द काँग्रेससह महाविकास आघाडीच्या इतर पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना दिल्याचे समजते.

विद्यमान परिस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांपैकी काँग्रेसची ताकद जास्त आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी, अशी संभाजीराजेंची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या विविध नेत्यांशी चर्चा करून उमेदवारीबाबत चाचपणी केली. तेव्हा त्यांना आधी काँग्रेस पक्षात प्रवेश करा, तुम्हाला कोल्हापुरातून उमेदवारी देऊ, असा शब्द काही काँग्रेस नेत्यांनी त्यांना दिल्याचे समजते.

काँग्रेस प्रवेशाबरोबरच संभाजीराजेंना त्यांची स्वराज संघटनाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याची अट घालण्यात आल्याचेही सांगण्यात येते. संभाजीराजेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्या संघटनेचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे, त्यामुळे ते ही अट मान्य करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे संभाजीराजेंनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोल्हापुरातून लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांना यश मिळाले नव्हते.  आता ते काँग्रेसकडून पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!