छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू असून परळी येथील नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर आज बी.ई. सिव्हिल अंतिम वर्षाचा डिझाईन ऑफ स्ट्रक्चर हा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या आधीच फुटून समाज माध्यमावर व्हायरल झाला. या पेपरफुटी प्रकरणी नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. तसेच बी.ई.(सिव्हील) अभ्यासक्रमाचा हा पेपरही रद्द करण्यात आला असून प्राचार्य व परीक्षा समन्वयकांच्या विरोधात ’एफआयआर’ दाखल करण्याचे आदेश कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १२ डिसेंबरपासून सुरु झाल्या आहेत. या परीक्षेत आज पाचव्या दिवशी दुपारच्या सत्रात बी.ई सिव्हिल अंतिम वर्षाचा डिझाईन ऑफ स्ट्रक्चर (थ्री) हा पेपर दोन वाजता सुरू होणार होता. मात्र हा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या आधीच फुटला आणि समाजमाध्यमावर व्हायरल झाला.
एक तास आधीच पेपरला फुटले पाय
पेपरफुटीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी तत्काळ दखल घेऊन परीक्षा विभागास चौकशीचे आदेश दिले. ही प्रश्नपत्रिका परळी येथील नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावरुन १ वाजून ८ मिनिटे व २२ सेकंदांनी ’डाऊनलोड’ करण्यात आली. तर १ वाजून ११ मिनिटांनी हा पेपर समजामाध्यमांवर लिक झाला.
एफआयआर नोंदवण्याचे आदेश
अभियांत्रिकी परीक्षेतील पेपरफुटीची माहिती समजताच कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. भास्करराव व परीक्षाप्रमुख समन्वयक डॉ.ए.बी.चाटे यांच्या विरोधात पोलीसात ’एफआयआर’ दाखल करण्याचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.भारती गवळी यांना दिले आहेत.
कठोर कारवाई करूः कुलगुरू
आभियांत्रिकी परीक्षेतील हा गैरप्रकार विद्यापीठ प्रशासन अजिबात खपवून घेणार नाही. संबधित महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याअंतर्गत संबंधित महाविद्यालयावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.
चार महाविद्यालये, ७९ विद्यार्थी
विद्यापीठाशी संलग्नित नागनाथअप्पा हालगे आभियांत्रिकी महाविद्यालय परळी वैजनाथ, आयसीईम व एवरेस्ट महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर) व के.टी.पाटील महाविद्यालय धाराशिव हे चार केंद्र असून एकूण ७९ विद्यार्थी परीक्षेस आहेत. आता हालगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले असून या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा वैद्यनाथ महाविद्यालयाच्या केंद्रावर घेण्यात येईल. तर रद्द करण्यात आलेला पेपर नंतर घेण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.