एम.फिल.धारक अध्यापकांना दिलासा, आता ‘असे’ मिळणार कॅस अंतर्गत पदोन्नतीचे लाभ; उच्च शिक्षण विभागाने दिले सुधारित निर्देश


मुंबईः  एम.फिल. अर्हता धारण केलेल्या अध्यापकांना नेट परीक्षा उतीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली असली तरी अनेक अध्यापकांना कॅस अंतर्गत पदोन्नतीचे लाभ नाकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने सुधारित आदेश जारी करून कॅसचे लाभ नाकारलेल्या अध्यापकांना हे लाभ देण्याचे निर्देश जारी केले आहेत.

एम. फिल. अर्हता धारण केलेल्या अध्यापकांना नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत उच्च शिक्षण विभागाने १६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या पत्रान्वये स्पष्टीकरण जारी केले होते. परंतु या पत्राचा चुकीचा अर्थ लावून १४ जून २००६ ते ११ जुलै २००९ या दरम्यान एम.फिल. अर्हता धारण करणाऱ्या अनेक अध्यापकांना कॅस अंतर्गत पदोन्नतीचे लाभ नाकारण्यात आले होते.

एम.फिल. धारक अध्यापकांना कॅसचे लाभ नाकारल्याची बाब विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी २ नोव्हेंबर २०२३ रोजी उच्च शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देत १६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या पत्रात सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सुधारित पत्र जारी केले आहे. त्यामुळे कॅसचे लाभ नाकारण्यात आलेल्या अध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उच्च शिक्षण विभागाच्या या सुधारित पत्रानुसार, १४ जून २००६ रोजी अथवा त्यापूर्वी नियुक्त झालेल्या अध्यापकांनी सेवेत असताना १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ या कालावधीत एम.फिल. ही पदवी प्राप्त केली असल्यास त्यांना कॅस अंतर्गत पदोन्नतीचे लाभ देण्यात येणार आहेत. त्यासाठी काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.

एम.फिल. अर्हताधारक अध्यापकांची नियुक्ती विहित निवड समितीमार्फत झालेली असावी, अशा अध्यापकांनी विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेली अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे, अशा अध्यापकांची नियुक्ती नियमित स्वरुपात असणे आवश्यक आहे, अशा अध्यापकांना एम.फिल. अथवा पीएच.डी. च्या आधारे नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांच्या नावासहित तसे संबंधित विद्यापीठांना कळवलेले असणे आवश्यक आहे, या अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.

या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या अध्यापकांनी नियुक्तीपूर्वी एम.फिल. अर्हता धारण केलेली असेल तर अशा अध्यापकांना नियुक्तीच्या दिनांकापासून कॅस अंतर्गत पदोन्नतीचे लाभ देण्यात येतील.

अध्यापकांनी सेवेत असताना एम.फिल. अर्हता धारण केली असेल तर विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेली मान्यता विचारात घेऊन विद्यापीठाने संबंधित अध्यापकांना ज्या दिनांकापासून नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिली असेल त्या दिनांकापासून त्या अध्यापकांना कॅस अंतर्गत पदोन्नतीचे लाभ दिले जाणार आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उप सचिव अजित बाविस्कर यांनी हे सुधारित परिपत्रक जारी केल्यामुळे कॅसचे लाभ नाकारलेल्या अध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!