अमरावतीच्या अचलपुरात एनआयएची छापेमारी, शिक्षकाच्या मुलाला चौकशीसाठी घेतले ताब्यात; लॅपटॉप-मोबाईल जप्त


अमरावतीः अमरावती जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचलपुरात आज पहाटे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएच्या दोन पथकांनी छापेमारी केली. या छापेमारीत एका शिक्षकाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हे अत्यंत संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. मागच्या दहा वर्षांत या शहरात अनेकदा जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. याच अचलपुरात सोमवारी पहाटे एनआयएची दोन पथके धडकली आणि त्यांनी छापेमारी केली.

एनआयएची दोन पथके सोमवारी पहाटे दोन वाजता जुन्या अचलपूर शहरातील अकबरी चौक परिसरात धडकले. त्यांनी या परिसरातील एका शिक्षकाच्या घरात पोहोचून त्या शिक्षकाच्या मुलाची चौकशी केली. त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

एनआयएच्या पथकांनी सोमवारी पहाटे दोन वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत या शिक्षकाच्या मुलाची चौकशी केली. हा युवक नागपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्याच्या हालचालींवर एनआयएची पथके लक्ष ठेवून होती. या छापेमारीच्या वेळी स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

एनआयएच्या पथकाने या युवकाच्या घरातून लॅपटॉप-मोबाईलसह वाचनाचे साहित्य आणि खासगी कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहितीही समोर येत आहे. या छापेमारीबाबत एनआयएने अधिकृतरित्या कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

नागपूर आणि मुंबई येथून तीन वाहनांमधून एनआयची पथके अचलपुरात पोहोचली. अचलपूर आणि सरमरसपुरा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ही पथके अकबरी चौक परिसरात पोहोचली. सुमारे १५ वाहनांच्या ताफ्यासह ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अचलपुरात खळबळ उडाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!