अधिष्ठाता डॉ. साळुंकेच्या दालनातच आरएसएसप्रणित मंचची खलबते, ‘चारसौ बीस’ सतीश पाटलांची प्र-कुलगुरूपदी वर्णी लावण्याचा निर्णय


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांना प्र-कुलगुरूपदावरून तडकाफडकी हटवल्यानंतर गुरुवारी सायंकाळी मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके यांच्या दालनात आरएसएस-भाजप प्रणित विद्यापीठ विकास मंचची बैठक झाली. या बैठकीत बराच वेळ ‘संघ दक्ष’ खलबते करून अवैध गुणवाढ प्रकरणात भादंविच्या कलम ४२० नुसार गुन्हा दाखल असलेले आणि परीक्षेच्या कामातून कायमस्वरुपी बाद करण्यात आलेले डॉ. सतीश पाटील यांची प्र-कुलगुरूपदी वर्णी लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी आपल्याच निर्णयावर यू-टर्न घेत गुरुवारी डॉ. वाल्मिक सरवदे यांना अवघ्या ४८ तासांतच प्र-कुलगुरूपदावरून हटवले. कुलगुरूंच्या या अनपेक्षित आणि तडकाफडकी निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळातील सर्वांनाच धक्का बसला. कुलगुरूंच्या या निर्णयानंतर गुरुवारी सायंकाळी मानव्य विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके यांच्या कार्यालयीन दालनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- भाजप प्रणित विद्यापीठ विकास मंचची बैठक झाली.

या बैठकीला राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य गजानन सानप, स्वतः डॉ. साळुंके, आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली खापर्डे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. वीणा हुंबे यांच्यासह विद्यापीठ विकास मंचचे व्यवस्थापन परिषद सदस्य आणि अन्य सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत डॉ. सरवदे प्रकरणावर चर्चा झाली. त्यानंतर नियमित प्र-कुलगुरूपदावर कोणाला बसवायचे? यावरही खल झाला. त्यातून अवैध गुणवाढ प्रकरणात भादंविच्या कलम ४२० नुसार गुन्हा दाखल असलेले आणि परीक्षेच्या कामातून कायमस्वरुपी बाद करण्यात आलेले डॉ. सतीश पाटील यांची प्र-कुलगुरूपदी वर्णी लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. येत्या ९ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक होत आहे. या बैठकीत प्र-कुलगुरूंचे नाव निश्चित करून ते राज्यपाल तथा कुलपतींच्या मान्यतेसाठी पाठवले जाणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम १३ (६) मधील तरतुदीनुसार कुलपतींनी कुलगुरूंशी विचारविनिमय करून विद्यापीठासाठी प्र-कुलगुरूंची नियुक्ती करावयाची आहे. मात्र आरएसएस-भाजप प्रणित विद्यापीठ विकास मंचने हा अधिकार आपल्याकडे घेतला की काय अशी शंका गुरूवारच्या त्यांच्या बैठकीतील निर्णयावरून घेण्यास वाव आहे. आता तर डॉ. सतीश पाटील यांची प्र-कुलगुरूपदी वर्णी लागलीच तर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कुलगुरू महोदय, ही वाचा डॉ. सतीश पाटलांची ‘चारसौ बीसी’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्रा. डॉ. सतीश सुधाकरराव पाटील यांच्या विरोधात विद्यापीठाचे अवैध गुणवाढ प्रकरणात तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांच्या फिर्यादीवरून २००९ मध्ये बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंविचे कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.  त्यांच्यासह अन्य पाच आरोपींविरुद्ध १० वे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

विद्यापीठाचे विद्यमान उपकुलसचिव ईश्वरसिंग रायभान मंझा यांनी सेवेत कार्यरत असूनही पूर्वपरवानगी न घेताच मार्च/एप्रिल २००६ मध्ये एम.एस्सी.ची (भौतिकशास्त्र) परीक्षा दिली होती. मंझा यांच्या द्वितीय सत्राच्या दोन आणि तृतीय सत्राच्या दोन अशा एकूण चार पेपरमध्ये अवैध मार्गाने गुणवाढ करण्यात आल्याचे प्रकरण २००९ मध्ये उघडकीस आले.

या गुणवाढ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कलम ३२(६)(अ) समितीने तेव्हा पदव्युत्तर कॅपचे (विज्ञान) प्रमुख असलेले डॉ. सतीश पाटील यांच्यावर कर्तव्यात अक्षम्य कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर विद्यापीठ परीक्षेच्या सर्व कामकाजासाठी कायमस्वरुपी बंदी घालण्याची आणि वरिष्ठांकडून शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस फेब्रुवारी २००९ मध्ये केली होती.

कलम ३२(६)(अ) समितीच्या शिफारशी परीक्षा मंडळाच्या ७ डिसेंबर २००९ रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारण्यात आल्या आणि डॉ. सतीश पाटील यांच्यावर परीक्षेच्या कामकाजासाठी कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली.

त्यानंतर २२ डिसेंबर २००९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि याप्रकरणी पोलिसात तक्रार देऊन खटला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १ फेब्रुवारी २०१० रोजी डॉ. सतीश पाटील यांच्यासह अन्य पाच आरोपींविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेगमपुरा पोलिसांनी तपास करून १० ऑगस्ट २०१० रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा निवाडा अद्याप व्हायचा आहे.

आपल्या स्वार्थासाठी विद्यापीठाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा गौण आहे, असे शिक्षक-प्राध्यापकांना वाटते, ही चिंतेची बाब आहे, असे व्यवस्थापन परिषदेने या ठरावात म्हटले होते. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ असून न्यायालयाने सतीश पाटील यांना अद्यापही निर्दोष ठरवलेले नाही. त्याच डॉ. सतीश पाटलांची प्र-कुलगुरुपदी वर्णी लावून कोणता आदर्श घालून दिला जाणार आहे?,  असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

 कुलगुरू, आता साळुंकेंनाही हटवणार का?

आरएसएस-भाजप प्रणित विद्यापीठ विकास मंच या विशिष्ट राजकीय विचारसणीच्या संघटनेची बैठक मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय सांळुके यांच्या कार्यालयीन दालनात घेण्यात आली, हे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमांतील तरतुदींचे उघड उल्लंघन आहे. डट. साळुंके यांनी आपल्या दालनात विद्यापीठ विकास मंचची बैठक घेण्याआधी कुलगुरू डॉ. फुलारी यांची पूर्वपरवानगी घेतली होती का? घेतली नसेल तर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमांतील तरतुदींचे उल्लंघन करून विद्यापीठाच्या इमारतीचा एका विशिष्ट राजकीय विचारसणीच्या संघटनेच्या बैठकीसाठी वापर करू दिला म्हणून कुलगुरू डॉ. फुलारी त्यांना अधिष्ठातापदावरून हटवून शिस्तभंगाची कारवाई करणार का?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कुलगुरू डॉ. फुलारींनी याबाबतच्या कारवाईच्या संदर्भासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियमाच्या कलम ११ (३) नुसार महाराष्ट्र सरकारने राजपत्रात प्रसिद्ध केलेली ८ फेब्रुवारी २०१० रोजीची अधिसूचना जरूर वाचावी, असे आमचे त्यांना सांगणे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!