डॉ.सुरेश गोसावी यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांनी सोमवारी स्विकारली. मावळते कुलगुरु डॉ.प्र. गो. येवले यांनी सकाळी कुलगुरु कक्षात डॉ. गोसावी यांना पदभार दिला.

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कलम ११ अंतर्गत ही नियुक्त करण्यात आली आहे. डॉ.गोसावी हे सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कार्यरत आहेत.

डॉ.गोसावी हे सोमवारी सकाळी पुण्याहून छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. डॉ.येवले व डॉ.गोसावी यांनी पदभार समारंभापूर्वी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकती पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, महात्मा फुले यांचा अर्धाकृती पुतळा तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी कुलसचिव दिलीप भरड, विद्यार्थो विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी डॉ.येवले यांनी डॉ.गोसावी यांच्याकडे मानदंड सोपवला.

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार अत्यंत विनम्रपणे स्वीकारतो, अशी भावना नवनियुक्त कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांनी पदभार घेताना बोलावून दाखवली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!