मुंबईः भाजपच्या नेत्या आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना पक्षात वारंवार डावलले जात आहे. भाजपमधीलच नेते त्यांचे राजकीय खच्चीकरण करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच महाराष्ट्रात शिरकाव करू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाची खुली ऑफर दिल्यानंतर पंकजा मुंडे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षात जाणार का? अशी चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, हे भाजपमध्ये फक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच माहीत आहे, असा मोठा दावा विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी यांच्या विधानामुळे पंकजांच्या राजकीय वाटचालीबद्दल नव्याने तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षाने दिलेल्या ऑफरबाबत विचारले असता आ. अमोल मिटकरी यांनी मागचे काही संदर्भ देत सांगितले की, मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच्या घडामोडी तुम्ही बारकाईने पहात असाल तर बऱ्याच प्रमाणात भाजपकडून पंकजा मुंडे यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. परवा कारखान्याची निवडणूक झाली. तेव्हा दोघेही बहीण-भाऊ (पंकजा मुंडे व धनंजय मुंडे) सामंजस्याने एकत्र आले. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील, असे आ. मिटकरी म्हणाले.
पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्या आपल्या पक्षात असाव्यात असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे मलाही वाटते की त्या आमच्या पक्षात असाव्यात, असे आ. मिटकरी यांनी उस्मानाबाद (धाराशिव) येथे टीव्ही९शी बोलताना सांगितले.
बीआरएस ही अफूची गोळी आहे. बीआरएस किंवा एमआयएमने पंकजा मुंडेंना काय ऑफर द्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या ऑफरला पंकजा मुंडे भाळतील आणि बीआरएसच्या गळाला लागतील, असे मला वाटत नाही. बीआरएसच्या गळाला जे लागले आहेत, त्यांचे महाराष्ट्रात भविष्य चांगले नाही, असेही आ. मिटकरी म्हणाले.
तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी बीआरएसला अद्याप महाराष्ट्रातला चेहरा दिला नाही. त्यामुळे हे गुलाबी वादळ आहे, काही दिवसांत शांत होईल. मात्र पंकजा मुंडे थोड्याच दिवसात त्यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील, हे भाजपमध्ये फक्त चंद्रशेखर बावनकुळेंनाच माहीत आहे, असा दावा आ. अमोल मिटकरी यांनी केला आहे.
पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जाईल का? असे विचारले असता आ. मिटकरी म्हणाले की, मुख्यमंत्री कोणाला करायचे? हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. मला जेवढे माहीत आहे, त्यानुसार बहुजन समाजात ओबीसींसाठी मोठा लढा उभारणाऱ्या गोपीनाथराव मुंडेंच्या त्या कन्या आहेत, त्या महाराष्ट्र लीड करू शकतात. त्या कणखर नेतृत्व आहेत. त्या आमच्या पक्षात आल्या तर आमच्या पक्षाचे बळ नक्की वाढेल. राहिला प्रश्न मुख्यमंत्रिपदाचा तर तो सर्वस्वी निर्णय हा शरद पवारांचा असतो, असे आ. मिटकरी म्हणाले.
पंकजा मुंडेंची भाजपमध्ये २०१९ पूर्वीपासूनच घुसमट
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये होणारी घुसमट लपून राहिलेली नाही. २०१९ आणि त्याही पूर्वीपासून पंकजा मुंडे यांना भाजपमधून अंतर्गत विरोध होत आलेला आहे. हा विरोध भागवत कराड यांना केंद्रात राज्यमंत्रिपद दिल्यानंतर आणखी उफाळून आला. कराडांऐवजी खा. प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती, परंतु भाजपने खेळी केली.
त्यानंतर पंकजा मुंडे यांना अनेकदा डावलण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मंडु यांच्यातील वितुष्टही जगजाहीर झाले आहे. फडणवीस हेच पंकजा मुंडे यांच्या भाजपमधील खच्चीकरणाला जबाबदार असल्याचा आरोपही पंकजा मुंडेंचे समर्थक अनेकदा करत आलेले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये होणारी ही घुसमट पंकजा मुंडे कितीकाळ निमूटपणे सहन करणार? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडलेला असतानाच आ. अमोल मिटकरी यांच्या या दाव्यामुळे पडद्यामागे काहीतरी घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.