प्रतीक्षा संपली! राज्याच्या बहुतांश भागात पुढचे पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस!


मुंबई:  गेल्या तीन आठवड्यांपासून रखडलेला मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढचे पाच दिवस कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेली पावसाची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे.

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून सक्रीय झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यांच्या बहुतांश भागात मान्सून सक्रीय राहणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता  असल्याचे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे. म्हणजेच पुढील पाच दिवस मान्सून राज्यात मनसोक्त कोसळणार आहे.

 पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या पाच दिवसांत राज्याच्या बहुतांश भागात मान्सून सक्रीय राहण्याचा अंदाज आहे. कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही पुढील पाच दिवस पावसाचा जोर राहील, असे होसाळीकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत २५ जून रोजी मध्यम तीव्रतेचा तर २६ ते २८ जून या दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही याच प्रमाणात पुढचे पाच दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

 रायगड जिल्ह्यात २५ ते २८ जून  या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरीत २४ ते २६ जून असे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार तर २८ व २९ जन रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ते २७ जून या तीन दिवसांच्या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोकणासह दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचीही शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

 नाशिक, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांसह राज्यातील १३ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही जिल्ह्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. शनिवारी सायंकाळनंतर मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने अनेकांची तारांबळ उडाली. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. विदर्भातील काही जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. आता पुढचे पाच दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याने शेतकरी सुखावणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!