‘भाच्या’च्या कुरापतीमुळे ‘मामा’ अडचणीत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात चौकशीच्या फेऱ्यात!


मुंबईः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षादेश झुगारून निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उतरलेले सत्यजित तांबे यांच्या कुरापतीमुळे ज्येष्ठ काँग्रेसनेते बाळासाहेब थोरातही अडचणीत सापडले आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बाळासाहेब थोरात यांच्या चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे स्वतः महाराष्ट्रात येऊन नाशिकमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल थोरात यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाळासाहेब थोरात हे सत्यजित तांबे यांचे सख्खे मामा आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आली. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांना पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला होता. परंतु उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपेर्यंत डॉ. सुधीर तांबे उमेदवारी अर्ज भरलाच नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी पक्षादेश झुगारून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

तांबे पितापुत्राच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आणि अनेक नाट्यमय घडामोडीही घडल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार या दोघांनाही काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. डॉ. सुधीर तांबे यांना चौकशी होईपर्यंत तर सत्यजित तांबे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

फडणवीसांची गुगली अन्…: विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याआधी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्यजित तांबे यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या पुस्तक प्रकाशन समारंभाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही हजर होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी ‘सत्यजित तांबेंवर आपली नजर असल्याचे’ म्हटले होते. थोरातांच्या उपस्थितीत फडणवीसांनी टाकलेल्या या गुगलीचे राजकीय परिणाम काही दिवसांतच पहायला मिळाले. सत्यजित तांबेंनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी  अर्ज भरला आणि बहुमताने निवडून येण्याची भाजपची मदत घेणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली.

अजित पवारांनी दिली होती पूर्वकल्पनाः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजित तांबे यांचे सख्खे मामा आहेत. त्यामुळे तांबे पिता-पुत्राच्या प्लानिंगबाबत बाळासाहेब थोरातांना कल्पना कशी नव्हती?  असा सवाल उपस्थित केला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अजित पवार यांनी तांबेंच्या प्लानिंगची माहिती आपण आधीच थोरातांना दिली होती, असा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे कल्पना असूनही थोरातांनी तांबे पिता-पुत्रांच्या प्लानिंगकडे हेतुतः दुर्लक्ष केले का? की त्यांच्या बंडखोरीला थोरातांचेही छुपे आशीर्वाद आहेत?, असे प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

पटोलेंकडून सारवासारव तरीही…: या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेबद्दलच शंका घेतल्या जाऊ लागल्याने त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी चर्चा दबक्या आवाजात काँग्रेस वर्तुळात होत होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे थोरातांची बाजू सावरून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असले तरी आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी थोरातांच्या चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे स्वतः थोरातांकडे चौकशी करणार आहेत. या चौकशीत थोरात काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

थोरात आजारीः विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना बाळासाहेब थोरात हे पडले होते. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही चौकशी आता थोरातांना रूग्णालयातून डिस्चार्ज झाल्यावर केली जाईल की रूग्णालयात जाऊनच एच. के. पाटील त्यांची भेट घेऊन विचारणा करतील, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!