बेंगळुरूः कर्नाटकमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व पदवी अभ्यासक्रमांत सायबर सुरक्षा हा अनिवार्य विषय असेल, अशी घोषणा शुक्रवारी कर्नाटकच्या उच्चशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. बी. थिमेगौडा यांनी केली. कर्नाटकचे उच्चशिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांच्या प्रमुख उपस्थितीत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम-२०२२ला आरंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.
उच्चशिक्षण क्षेत्रातील सध्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान या अभ्यासक्रमांच्या व्यतिरिक्त नवा सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या वर्षी सरकारने नॅसकॉमच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल फ्लुएन्सी हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत, असे थिमेगौडा यांनी सांगितले.
सर्व प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांत हे विषय अनिवार्य आहेत. माहिती तंत्रज्ञानमंत्री नारायण म्हणाले की, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सायबर सुरक्षेचे शिक्षण देण्याची गरज आहे. राज्यात सायबर सुरक्षा बळकट करण्यासाठी लवकरच राज्याचे धोरण जाहीर केले जाईल.