मुंबईः काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते आजच आमदारकीचाही राजीनामा देतील आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यास तो काँग्रेससाठी मोठा धक्का ठरणार आहे.
अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून राजीनाम्याची प्रक्रिया समजून घेतली. मी पुन्हा येतो, असे सांगून चव्हाण हे नार्वेकरांच्या कार्यालयातून बाहेर पडल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
अशोक चव्हाण यांच्याकडून अद्याप तरी राजीनाम्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही किंवा विधिमंडळ सचिवालयाला त्यांचा राजीनामाही प्राप्त झालेला नाही. भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. चव्हाण यांच्या सोबतच काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे कालच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथल्ला हे मुंबईत होते. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला अशोक चव्हाणही हजर होते आणि आज त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. काँग्रेसमधील अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षे वाटचाल करत आहे, त्यातून जनतेशी घट्ट नाळ जोडलेल्या नेत्यांची घुसमट होत आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे काही मोठे निश्चितच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आता एवढेच म्हणेन ‘ आगे आगे देखिए होता है क्या,’ असे फडणवीस म्हणाले.