हिंगोलीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काश्मीर ते कन्याकुमारी ही ‘भारत जोडो’ यात्रा सध्या महाराष्ट्रात असून नांदेड जिल्ह्यातून ही यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात प्रवेशकर्ती झाल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी हिंगोलीत या यात्रेत आपला सहभाग नोंदवला. इंदिरा गांधींच्या नातूसोबत बाळासाहेब ठाकरेंचाही नातू या भारत जोडो यात्रेत साथ- साथ चालतानाची दृश्ये या पदयात्रेत सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यांना सुखावणारी ठरली. दोन भिन्न विचारणीच्या राजकीय पक्षात काम करणारे दोन नातू एकाच पदयात्रेत चालतानाची दृश्ये टिपण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांचीही झुंबड उडाली होती!
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्याचा पाहुणाचार घेऊन आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. रस्त्यांच्या दुतर्फा खच्चून झालेली गर्दी, युवा वर्गाच्या आशेचा नवा किरण आणि नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह अशा वातावरणात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दाखल झालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमधून आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. भारत जोडो यात्रेने नांदेड जिल्ह्यात अनुभवलेली गर्दी आणि प्रचंड उत्साह ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल झाल्यानंतरही पहायला मिळाला. मागील चार दिवस ही भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात होती.
भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज सकाळीच मुंबईहून हिंगोलीत दाखल झाले. त्यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते सचिन अहीर हेही होते. हिंगोलीत भारत जोडो यात्रेत सहभागी होताच आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांची गळाभेट घेतली तेव्हा भारत जोडो पदयात्रेत सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड गजर केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती या यात्रेत सहभागी होत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही या यात्रेत सहभागी झाले होते.
आम्ही वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असलो तरी संविधानासाठी, देशासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी एकत्र आलो आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मागील तीन-चार महिन्यांपासून जे सरकार अस्तित्वात आहे ते घटनाबाह्य सरकार आहे. आणि अशा घटनाबाह्य सरकारच्या वागणुकीमुळे आपल्या देशात राज्यघटनेला आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. राज्यघटना धोक्यात आली आहे. देशातील लोकशाही टिकून रहावी म्हणून आम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांमध्ये आणि इंदिरा गांधींमध्ये चांगले संबंध होते. आमचेही संबंध चांगले आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
एक वर्तुळ पूर्णः राहुल गांधी यांच्या आजी स्व. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली होती. त्या आणीबाणीचा बहुतेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी विरोध केला असतानाच आदित्य ठाकरे यांचे आजोबा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता आणि आणीबाणीचे समर्थन केले होते. आता जाती धर्माच्या नावावर विखुरलेला देश जोडण्याच्या उद्देशाने राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांनी सहभागी होऊन एक वर्तुळ पूर्ण केले आहे!