मुंबईः दिवाळी सणाच्या दिवसात गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची ओसंडून वाहणारी गर्दी ‘कॅश’ करण्यासाठी एसटी महामंडळाने गर्दीच्या हंगामात १० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर १० टक्के भाडेवाढीचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
दिवाळी सणाच्या दिवसात प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहते. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांना प्रवाश्यांकडून मोठी पसंती असते. ही गर्दीच कॅश करून हंगामी महसूल वाढ करण्यासाठी एसटी महामंडळाने १० टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. ही हंगामी भाडेवाढ ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे.
एसटी महामंडळाची ही हंगामी भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही आसनी व शयन आसनी बसेसना लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला मात्र ही भाडेवाढ लागू राहणार नाही.
एसटी महामंडळाने केलेली ही भाडेवाढ साधारणपणे ५ ते ७५ रुपयांपर्यंत असणार आहे. ज्या प्रवाशांनी एसटीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशांकडून वाहकांद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. परंतु ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास आणि मासिक, त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू राहणार नाही. १ नोव्हेंबरपासून ही भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकरले जातील, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
दिवाळी सणाच्या दिवसांत होणारी गर्दी पाहता एसटी महामंडळाने २१ ते ३१ ऑक्टोबर या दहा दिवसांसाठी १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी स्पेशल नावाने या गाड्या राज्यभरात सोडण्यात येत आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली.