उच्चशिक्षण सहसंचालकांच्या वरिष्ठ लिपिकाची चौकशी तब्बल सात महिन्यांपासून गुलदस्त्यातच, प्रशासन अधिकाऱ्याकडून लपवाछपवी!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  औरंगाबाद विभागाच्या उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक  सय्यद फईमोद्दीन यांच्याविरुद्धच्या आरोपांची सखोल चौकशी करून प्रचलित नियमांतील तरतुदींनुसार उचित कारवाई करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने देऊन आठ महिने उलटले तरी ही चौकशी आणि कारवाई गुलदस्त्यातच असून सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी यू. व्ही. सांजेकर यांच्याकडून याबाबत लपवाछपवी केली जात आहे.  एवढेच नव्हे तर प्रकरण चौकशीधीन असतानाच फईमोद्दीन यांना पेन्शनसह सेवानिवृत्तीचे अन्य लाभ देण्याची तयारीही सहसंचालक कार्यालयाने केली आहे.

औरंगाबाद विभागाच्या उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयात वर्षानुवर्षे वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असलेले सय्यद फईमोद्दीन यांच्यावर अनियमितता आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे २६ ऑगस्ट २०२२ रोजी तक्रार करण्यात आली होती.

फईमोद्दीन यांच्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी ह. व्यं. पऱ्हाते यांनी २१ सप्टेंबर २०२२ रोजी राज्याच्या उच्चशिक्षण संचालकांना पत्र लिहून फईमोद्दीन यांच्याबाबतच्या तक्रारींची सखोल चौकशी करून प्रचलित नियमांतील तरतुदींनुसार उचित कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश दिले होते. ज्या पत्राद्वारे हे निर्देश जारी करण्यात आले त्या पत्राचा क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२४९/मशि-१ दिनांक २१ सप्टेंबर २०२२ असा आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आदेश जारी करून आजघडीला तब्बल सात महिने उलटून गेले आहेत. तरीही फईमोद्दीन यांची सखोल चौकशी झाली का? चौकशी झाली असेल तर त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात आली? हे सगळेच गुलदस्त्यात आहे. औरंगाबाद विभागाच्या उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी यू.व्ही. सांजेकर यांच्याकडून याबाबत लपवाछपवी केली जात असून आरटीआय अंतर्गत याबाबतची मागणी करणाऱ्या अर्जांना त्रयस्थ पक्षाच्या माहितीचे कारण देऊन केराची टोपली दाखवली जात आहे. सांजेकर याच माहिती अधिकारीही आहेत.

काय आहेत फईमोद्दीन यांच्यावर आरोप?

सय्यद फईमोद्दीन यांनी पद व अधिकाराचा गैरवापर करून खुलताबाद येथील चिश्तिया महाविद्यालयातील ११ प्राध्यापकांच्या सेवापुस्तिकेतील तारखांवर व्हाइटनर लावून खाडाखोड केली. अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नसताना नियुक्ती आणि रूजू दिनांच्या तारखांत हेराफेरी केली आणि स्वतःच्या स्वाक्षरीने ही हेराफेरी प्रमाणित केली. सेवार्थ प्रणालीमध्ये चुकीची माहिती सादर करून सय्यद फईमोद्दीन हे काही प्राध्यापकांना आर्थिक लाभासाठी ब्लॅकमेल करत आहेत, असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थाननिश्चिती मान्यता नसताना तसेच शासन व यूजीसीच्या नियमानुसार पीएच.डी. धारण केलेली नसताना आणि रिफ्रेशर कोर्स, ओरिएन्टेशन कोर्स नसतानाही फईमोद्दीन यांनी चिश्तिया महाविद्यालयातील पी. डब्ल्यू. रामटेके व इतर प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापकाचे अवैधरित्या लाभ दिले, असाही त्यांच्यावर आरोप आहे.

स्थाननिश्चिती देताना यूजीसीचे नियम, अटी व शर्ती तसेच महाराष्ट्र सरकारचे नियम व अटींचे उल्लंघन करून शैक्षणिक अर्हता नसतानाही अपात्र उमेदवारांना नियमबाह्यपणे स्थाननिश्चिती लाभ देऊन कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा करून सय्यद फईमोद्दीन यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. या तक्रारीसोबत पुरावा म्हणून काही प्राध्यापकांच्या सेवापुस्तिकेच्या छायांकितप्रतीही जोडल्या आहेत.

चिश्तिया महाविद्यालयात इंग्रजी विषयाची मान्यता, शासनाचे अनुदान, कार्यभार, पद, विद्यार्थी संख्या आणि प्रवेश नसतानाही तत्कालीन सहसंचालक फैय्याज यांना हाताशी धरून सय्यद फईमोद्दीन यांनी स्वतःच्या नातेवाईकांच्या नियमबाह्य नियुक्त्या बेकायदेशीरित्या नियमित केल्या आणि अनुदानही दिले. अशी एकूण सहा प्रकरणे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून सय्यद फईमोद्दीन यांच्या गैरव्यवहारामुळे शासनास कोट्यवधी रुपयांचा चुना लागल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

उसनवारी आले आणि…

सय्यद फईमोद्दीन यांची मूळ नियुक्ती ही औरंगाबाद विभागाच्या उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयात नाही. त्यांची शासकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर होती. तेथून ते उसनवारीवर उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयात आले आणि सेवानिवृत्तीचे वय जवळ येऊन ठेपेपर्यंत येथेच राहिले. फईमोद्दीन हे मेअखेरीस सेवानिवृत्त होणार असून त्यांच्याविरुद्धची चौकशी गुलदस्त्यातच ठेवून त्यांना पेन्शनसह सेवानिवृत्तीचे अन्य लाभ देण्याची तयारी सहसंचालक कार्यालयाने करून ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!