हिंगणा तालुक्यातील इसासनी, निलडोह, डिगडोह पाणी पुरवठा योजनेला मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ


नागपूर: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील इसासनी-वागधरा तसेच निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेची कामे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. तथापि या कामांची अंतिम टप्प्यातील उर्वरित कामे पाहता या कामांना मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात येईल, ही कामे पूर्ण न झाल्यास कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

आमदार समीर मेघे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. इसासनी-वागधरा योजनेला २८ डिसेंबर २०१८ रोजी तर निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेला ४ फेब्रुवारी २०१९ रोजी मान्यता देण्यात येऊन १७ सप्टेंबर २०१९ रोजी कामाचे कार्यादेश देण्यात आले होते, असे पाटील म्हणाले.

 या योजनांचा मूळ कालावधी १८ महिन्यांचा होता. तथापि, कोविड-१९ च्या प्रादूर्भावामुळे कामे बंद असल्याने कामांना उशीर झाला, अशी माहिती पाटील यांनी दिली.

कंत्राटदाराने कोरोना कालावधी वगळता इतर कालावधीमध्ये बारचार्टप्रमाणे कामे पूर्ण न केल्याने कंत्राटदारावर १६ सप्टेंबर २०२१  पासून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. आता ही कामे अंतिम टप्प्यात आली असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात येईल, असे पाटील म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!