
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केलेल्या ‘पीएचडी करून करून काय दिवे लावणार?’ या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरूवारी विविध विद्यार्थी संघटना आणि संशोधक छात्रांनी चप्पल, बुटावर फोटो चिटकवून अजित पवारांचा निषेध केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य हे संशोधक विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणारे असून या वक्तव्यातून अजित पवार यांनी स्वतःचे अज्ञान स्पष्ट केले आहे. अजित पवार हे अर्थ खात्याच्या माध्यमातून बहुजनांचे खच्चीकरण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पैशात तरी घोटाळा करू नये अशा भावना संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
अजित पवार हे भ्रष्ट, विश्वासघाती आहेत. त्यांनी पैसा व सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा देखील आरोप आंदोलकांनी केला. धरणात लघुशंका करण्याचे वक्तव्य व सिंचन घोटाळ्याचा देखील या आंदोलनाच्या घोषणेत समावेश होता.
फेलीशिपसाठी २०९ विद्यार्थ्यांची मर्यादा तत्काळ उठवण्यात यावी, मागेल त्याला संशोधनासाठी फेलोशिप देण्यात यावी हेच अजित पवार यांचे प्रायश्चित्त ठरेल असेही या आंदोलकांनी म्हटले आहे.

यावेळी अजित पवार यांचा पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष यांना मतदान न करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
या आंदोलनात स्वाभिमानी मुप्टा, बामुक्टो, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, एसएफआय, एमआयएम विद्यार्थी आघाडी, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, एनएसयीआय आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
यावेळी डॉ.शंकर अंभोरे, प्रा.उमाकांत राठोड, डॉ.देवानंद वानखेडे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे,डॉ.कुणाल खरात, नारायण खरात, संदीप तुपसमुद्रे, ऍड.अतुल कांबळे, भागवत चोपडे, भीमराव वाघमारे, लोकेश कांबळे, दीक्षा पवार, मानव साळवे, विकास रोडे,अर्जुन मोरे,लएकनाथ तिरमले, किरण धाटे, गौतम साळवे, अक्षय जाधव, रवी व्हावळे, सचिन भुईगळ, मनीषा बल्लाळ, पल्लवी बोराळकर, निशिकांत कांबळे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
