आ. सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमोल मिटकरी, निंबाळकरांच्या अपात्रतेसाठी शरद पवार गटाचे विधान परिषद सभापतींकडे अर्ज


मुंबईः एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही आणि अजित पवार हे आजही आमच्या पक्षाचे नेते आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सांगत असतानाच दुसरीकडे कायदेशीरदृष्ट्या अजित पवार गटाची कोंडी करण्याचे प्रयत्नही करत आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यसाठी दोन स्वतंत्र अर्ज केले आहेत. एक अर्ज विधानसभा अध्यक्षांकडे तर दुसरा अर्ज विधान परिषदेच्या सभापतींकडे करण्यात आला आहे. विधान परिषद सभापतींकडे केलेल्या अर्जात आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. अमोल मिटकरी, रामराजे निंबाळकर यांना अपात्र ठरवण्याची विनंती करण्यात आली आहे.

शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेने विधानसभा सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठीचे अर्ज केलेले आहेत. मात्र शरद पवार गटाने विधान परिषद सदस्यांनाही अपात्र ठरवण्यासाठीचे अर्ज दाखल केले आहेत.

शिवसेनेच्या दोन गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकत्रित सुनावणी घेणार असल्याचे सांगण्यात येते. ही प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच आता शरद पवार गटाने अजित पवारांच्या गटातील आमदारांना धक्का देण्याचे तंत्र अवलंबिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधान परिषद सभापतींकडे अर्ज केला आहे. अपात्रतेच्या कारवाईसाठी एकच अर्ज पुरेसा असताना शरद पवार गटाने दोन स्वतंत्र अर्ज केले आहेत.

शरद पवार गटाने अजित पवार गटातील ज्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी अर्ज केले आहेत त्यात मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे यांच्या नावाचा समावेश एका अर्जात तर रामराजे निंबाळकर यांना अपात्र ठरवण्यासाठीचा समावेश दुसऱ्या अर्जात करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!