एकही दिवसाची वैद्यकीय रजा न घेताच कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंनी मेडिकल बिलापोटी लाटले ३ लाख ४३ हजार २०६ रुपये!


सुरेश पाटील/छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

अनियमिततेच्या चक्रव्यूहात अध्यापकीय कारकीर्द काळवंडलेली असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळवलेले डॉ. प्रमोद येवले यांनी छत्रपती संभाजीनगरात रूजू झाल्यानंतरही अनेक ‘कारनामे’ करत अनियमितता केल्या आहेत. एकही दिवसाची वैद्यकीय रजा न घेताच डॉ. येवले यांनी तब्बल ३ लाख ४३ हजार २०६ रुपयांचा वैद्यकीय खर्च लाटल्याचे धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत.

डॉ. प्रमोद येवले यांनी गिलेन बॅरे सिंड्रोम (guillain barre syndrome) या आजारावर कमलनयन बजाज रुग्णालयाच्या आंतररूग्ण विभागात ३१ ऑक्टोबर २०२० ते ८ नोव्हेंबर २०२० असे एकूण नऊ दिवस उपचार घेतल्याचे दाखवले. या उपचारासाठी त्यांनी ३ लाख ५४ हजार ५१३ रुपये खर्च झाल्याचा दावा केला.

हेही वाचाः ‘लायकी’ नसतानाही डॉ. प्रमोद येवले कुलगुरू कसे झाले? नागपूरच्या सहसंचालकांच्या फॅक्ट फाइडिंग रिपोर्टमध्ये ‘ना लायकी’चा पर्दाफाश!

या उपचाराच्या नावाखाली कुलगुरू डॉ. येवले यांनी विद्यापीठ निधीतून २ नोव्हेंबर २०२० रोजी १ लाख रुपये, ६ नोव्हेंबर २०२० रोजी आणखी १ लाख रुपये अग्रीम रक्कम उचलली. त्यानंतर त्यांनी २ डिसेंबर २०२० रोजी वैद्यकीय अग्रीम समायोजित करण्यासाठी ३ लाख ४३ हजार २०६ रुपयांची बिले सादर केली आणि १ लाख ४३ हजार २०६ रुपयांची उर्वरित रक्कम विद्यापीठ निधीतूनच उचलली.

वैद्यकीय बिलाच्या रकमेतही घोळ

विदयापीठ निधीतून ३ लाख ४३ हजार २०६ रुपये उचलल्यानंतर जवळपास आठ महिन्यांनी डॉ. येवले यांनी छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे वैद्यकीय देयक प्रतिपूर्तीसाठी दावा केला. त्यासाठी त्यांनी ३ लाख ५४ हजार ५१३ रुपयांची बिले सादर केली. विभागीय सहसंचालक कार्यालयाने ७ जुलै २०२१ रोजी डॉ. येवले यांचे वैद्यकीय बिल उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवले.

हेही वाचाः सहायक प्राध्यापकपदासाठीही ‘लायक’ नसलेले डॉ. प्रमोद येवले यांची प्राचार्यपदावरील नियुक्तीच नियमबाह्य, निकष धाब्यावर!

डॉ. येवले यांच्या वैद्यकीय खर्चाची परिगणना करून राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी ३ फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ. येवले यांच्या ३ लाख २ हजार ८९१ रुपये वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीस मान्यता दिली.

डॉ. येवले यांनी विद्यापीठात अग्रीम रक्कम समायोजित करण्यासाठी दाखल केलेले ३ लाख ४३ हजार २०६ रुपयांची वैद्यकीय बिले आणि विभागीय सहसंचालक कार्यालयात प्रतिपूर्तीसाठी दाखल केलेली ३ लाख ५४ हजार ५१३ रुपयांची बिले याच्यात ११ हजार ३०७ रुपयांची तफावत आहे.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे वैद्यकीय बिलाच्या प्रतिपूर्तीसाठी ३ लाख ४५ हजार ५१३ रुपयांची बिले सादर केली.

राजभवन म्हणते एक दिवसही रजा नाही!

डॉ. प्रमोद येवले यांनी वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी केलेल्या दाव्यानुसार ते कमलनयन रुग्णालयाच्या आंतररूग्ण विभागात उपचारासाठी ९ दिवस दाखल होते.  कोणत्याही लोकसेवकाला त्याच्या आजारपणावर उपचार घ्यावयाचे झाल्यास त्याला सक्षम प्राधिकाऱ्याकडून वैद्यकीय रजा मंजूर करून घ्यावी लागते. काही परिस्थितीत ही वैद्यकीय रजा उपचारानंतरही मंजूर करून घेतली जाऊ शकते. परंतु डॉ. येवले यांनी त्यांचे सक्षम प्राधिकारी महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपालांकडून अशी कोणतीही रजाच मंजूर करून घेतली नाही.

डॉ. प्रमोद येवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रूजू झाल्यापासून अर्जित रजा, अर्धवेतनी रजा, परिवर्तीत अथवा वैद्यकीय रजा यापैकी कुठल्याही प्रकारची रजा घेतली नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. त्यामुळे डॉ. येवले यांच्या वैद्यकीय उपचाराबाबतच शंका निर्माण झाली आहे.

कुलगुरू डॉ. येवले वैद्यकीय उपचारासाठी सोडाच परंतु रूजू झाल्यापासून कुठल्याही प्रकारची एकही रजा घेतली नसल्याचे राजभवनाकडून प्रमाणित करण्यात आले आहे.

उपचार घेतलेच की नाही, नेमके खरे काय?

राजभवनाने दिलेल्या माहितीनुसार डॉ. प्रमोद येवले यांनी एकही दिवसाची वैद्यकीय रजा घेतली नसेल तर डॉ. येवले हे कमलनयन बजाज रुग्णालयाच्या आंतररूग्ण विभागात उपचारासाठी दाखल होते की नाही? डॉ. येवलेंनी उपचार न घेताच वैद्यकीय बिले सादर करून रकमा लाटल्या की काय? असे प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत.

विनारजा उपचार घेणे कुठली ‘कुशलता’?

डॉ. प्रमोद येवले यांनी राजभवनाला न कळवता किंवा वैद्यकीय रजा मंजूर करून न घेताच कर्तव्याला दांडी मारून तब्बल नऊ दिवस उपचार घेतले असतील तर वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने केलेली ही अत्यंत गंभीर स्वरूपाची अनियमितता आहे. सामान्य कर्मचाऱ्याने रजा मंजूर करून न घेता एकही दिवस परस्पर दांडी मारली तर त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उचलला जातो, परंतु डॉ. प्रमोद येवले यांच्याविरुद्ध तशी कोणतीही कारवाई झालेली नाही.

कुलगुरू डॉ. येवले यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे अग्रीम समायोजनासाठी ३ लाख ४३ हजार २०६ रुपयांची वैद्यकीय बिले सादर केली. विभागीय सहसंचालकांकडे सादर केलेली बिले आणि विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केलेली बिले यांच्या रकमेत तफावत कशी? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.

वैद्यकीय बिलेच खोटी?

डॉ. प्रमोद येवले यांनी वैद्यकीय रजा नसताना कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतल्याचे भासवून ३ लाख ४३ हजार २०६ रुपयांची बिले उचलली. वैद्यकीय रजा नसताना आजारी असल्याचे सांगून त्यांनी कमलनयन बजाज रुग्णालयात उपचार घेतल्याची गोष्ट खोटी आहे. त्यामुळे डॉ. येवले यांच्याकडून वैद्यकीय बिलाची रक्कम एक रकमी वसूल करण्यात यावी आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बोरीकर यांनी केली आहे.

कुलगुरू येवले यांच्या या कथित वैद्यकीय खर्चाबाबत बोरीकर यांनी डिसेंबर २०२१ पासून उच्च शिक्षण संचालकांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या तक्रारीवरून उच्च शिक्षण संचालक आणि विभागीय सहसंचालक कार्यालयाने विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे वारंवार स्पष्टीकरण मागवले आहे. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यातील नेमके सत्य काय? हे कुलगुरू डॉ. येवले यांनी स्वतः होऊन जाहीर करावे, असे न्यूजटाऊनचे खुले आव्हान आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!