डॉ. आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे आठ उमेदवार विजयी, विद्यमान संचालक मंडळाचा धुव्वा


औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या आठ उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत विद्यमान पॅनलचे फक्त दोनच उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे आता नव्या संचालक मंडळाकडे बँकेची धुरा जाणार हे स्पष्ट झाले आहे.

डॉ. बाबासाहे आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्याची आज मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना वाडेकर यांनी मतमोजणीनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर केला. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे उमेदवार प्रशांत विठ्ठलराव कासोदकर, डॉ. प्रमोद मोतीराम दुथडे, प्रल्हाद भगवानराव अंभोरे, मुरलीधर दगडोजी सोनवणे, चक्रधर आसाराम मगरे, बळवंत माणिकराव रगडे, ज्योती मनोज आदमाने हे सात उमेदवार विजयी झाले आहेत. परिवर्तन पॅनलचे कोंडिराम बाबुराव सारूक हे उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळाच्या आदर्श पॅनलचे कृष्णा बनकर आणि छाया मेश्राम हे दोनच उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत एकूण ८७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी छाया सुधाकर मेश्राम यांना सर्वाधिक ४४८ मते मिळाली. त्या खालोखाल कृष्णा बनकर यांना दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक ४४७ मते मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत बँकेचे संस्थापक भीमराव आराक यांचे चिरंजीव दीपक भीमराव आराक यांचाही पराभव झाला. त्यामुळे आता नव्या संचालक मंडळाकडे बँकेची धुरा जाणार हे स्पष्ट झाले आहे.

विद्यमान संचालक मंडळातील सहा जण आधीच झाले होते बादः आरबीआय, महाराष्ट्र शासन, सहकारी बँकिंग क्षेत्रातील नियामकांच्या आदेशाची पायमल्ली केल्यामुळे आणि नुकसान भरपाईसाठी जबाबदारी निश्चित करूनही नुकसान भरपाई करण्यास टाळाटाळ केल्यामुळे विद्यमान संचालक मंडळातील सहा संचालकांना ही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आणि त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. त्यात बँकेचे अध्यक्ष आत्माराम विष्णू बोराडे, बँकेचे उपाध्यक्ष प्रज्ञाशील पाटील,  युवराज दौलतराव दांडगे, सीताराम आव्हाड, पुष्पा खिल्लारे (धुळे),  आणि रतन भालेराव यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कअ (१)(iii)(iv) नुसार आणि बँकेच्या मंजूर उपविधीच्या कलम ४५(g) नुसार या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे हे सहा जण आधीच निवडणुकीच्या मैदानातून बाद झाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!