पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या एसएससी म्हणजेच इयत्ता दहावी आणि एचएससी म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावी-बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आतापासूनच तयारीला लागावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात येते. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचा कालावधी मंडळाने जाहीर केला आहे.
मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ या कालावधी घेतली जाणार आहे तर इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०२४ या कालावधी होणार आहे. मंडळाने हे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केले असून सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी तुम्ही www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून छापील वेळापत्रक पुरवण्यात येते. ते छापील स्वरुपातील वेळापत्रक अंतिम वेळापत्रक असणार आहे. त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळे किंवा व्हॉट्सअप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.