हर्सूल कारागृहातील कैद्यांचा तुरूंग अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फिल्मी स्टाइल हल्ला; ९ कैद्यांविरुद्ध गुन्हा


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तुरूंग अधिकाऱ्याबरोबरच कर्मचाऱ्यांवर फिल्मी स्टाइलने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुरुंग अधिकाऱ्याकडून कैद्यांची अंग झडती घेतली जात असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी ९ कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्सूल मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची अंगझडती घेतली जाते आणि कैद्यांच्या संशयास्पद हालचालींवर लक्षही ठेवले जाते. कैद्यांकडे काही अवैध वस्तू आहे का? याचा शोध घेण्यासाठी ही अंगझडती घेतली जाते. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तुरुंग अधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर हे कैद्यांची अंगझडती घेत असतानाच शाहरूख अकबर शेख हा कैदी आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार एका कैद्याने येऊन केली.

कैद्याच्या या तक्रारीनंतर अंतर्गत सुरक्षा अधिकारी सतीश हिरेकर यांनी शाहरूख अकबर शेख याला चौकशीसाठी बोलावून घेतले. शाहरूखची चौकशी सुरू असतानाच तो जोरजोरात ओरडू लागला आणि त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या कैद्याला थेट मारहाण करू लागला. त्यामुळे तेथे हजर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

सर्व अधिकारी आणि कर्मचारी वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच शाहरूखने तुरूंग अधिकारी प्रवीण मोडकर यांच्या गळ्याला पकडून पायात पाय घालून त्यांना खाली पाडले आणि त्यांना तो लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला.

हा प्रकार सुरू असतानाच बॅरेक क्रमांक १ मधील काही कैदी बॅरेकचा दरवाजा जोरात ढकलून बारे आले. त्यापैकी गजेंद्र मोरे याने या भांडणात येऊन इतर कैद्यांना चिथावणी दिली आणि अधिकारी/कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले.

मोरेच्या चिथावणीमुळे अन्य कैद्यांनी तुरूंग अधिकारी मोडकर आणि अमित गुरव, सुमंत मोराळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ला प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये शाहरूख अकबर शेख (वय ३० वर्षे), सतीश खंदारे (वय ३० वर्षे), गजेंद्र ऊर्फ दादा तुळशीराम मोरे (वय ४२ वर्षे), निखील गरज (वय २५ वर्षे), किरण साळवे (वय २२ वर्षे), ऋषीकेश तनपुरे (वय २५ वर्षे), अनिल शिवाजी गडवे (वय २५ वर्षे), अनिकेत दाभाडे (वय २२ वर्षे) आणि राजा जाधव (वय २६ वर्षे) या कैद्यांचा समावेश आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!