औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा गणातील निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून आता काही सेकंदांपूर्वी अवैध मतांची गणती सुरू करण्यात आली आहे. अवैध मतांची गणती झाल्यानंतर त्यावरील आक्षेप घेतले जातील आणि नंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल.
आज सकाळी दहा वाजता या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. रात्री साडेआकराच्या सुमारास मतपत्रिकांच्या विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर अवैध मतांची गणती सुरू करण्यात आली आहे. अवैध ठरवण्यात आलेली ही मते उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना दाखवली जातील. त्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपांवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात केली जाईल. अवैध मतांची गणती आणि त्यावरील आक्षेपांच्या निरस्सणाची प्रक्रिया यात किती वेळ जाईल त्यावरच मतमोजणीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू व्हायला किती वेळ लागेल, हे ठरेल.
हेही वाचाः ‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूक निकालः कोऱ्या मतपत्रिकांच्या ‘जहूर’मुळे काही जणांचा ‘उत्कर्ष’ अडचणीत!
या प्रक्रियेनंतर अनुसूचित जाती गटातील मतमोजणी पहिल्यांदा हाती घेतली जाईल आणि साधारणतः तीन ते साडेतीन तासांनंतर पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. यावेळची मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाने मतमोजणीची ही प्रक्रिया ४८ तास चालेल असा अंदाज बांधून नियोजन केले आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त वेळ लागेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.