बीडः जमिनीवर ताबा घेण्याच्या हेतूने एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे उघडकीस आली आहे. या धक्कादायक प्रकरणाचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघांविरुद्ध विनयभंग आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे.
आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील ४० वर्षीय आदिवासी महिला १५ ऑक्टोबर रोजी तिच्या शेतात मका काढत होती. तिचा पती आणि सूनही शेतात काम करत होते. त्या ठिकाणी आलेल्या काही लोकांनी या आदिवासींच्या शेतजमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धसही त्यांच्यासोबत आल्या होत्या.
या आदिवासीच्या शेतातवर आलेल्या लोकांपैकी रघु पवार आणि राहुल जगदाळे या दोघांनी या आदिवासी महिलेला मारहाण करत तिला विवस्त्र केले आणि तिचा विनयभंग केला.
रघु कैलास पवार आणि राहुल माणिक जगदाळे या दोघांनी पती आणि सुनेसमोरच मला विवस्त्र करून मारहाण केली आणि विनयभंग केला. प्राजक्ता सुरेश धस या त्याच ठिकाणी आडोश्याला उभे राहून ‘घाबरू नका, तिला चांगला चोप द्या’ असे म्हणत होत्या. पती आणि सून माझ्या दिशेने येत असल्याचे पाहून दोघेही पळाले. त्यावेळी मी रघु पवार याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत होते,’ असे पीडितेने आष्टी पोलिस ठाण्यात दिलेले फिर्यादीत म्हटले आहे.
प्राजक्ता धस यांनी सोबत आणलेले वीस ते पंचवीस गुंड त्या ठिकाणी जमले होते. पोलिस आल्यामुळे त्यांना आमच्यावर हल्ला करता आला नाही. हा सर्व प्रकार पोलिसांनी सुद्धा पाहिला आहे. त्यांच्यासमोरच हे सर्व घडले. प्राजक्ता धस यांच्या सांगण्यावरून रघु पवार व राहुल जगदाळे यांनी माझा छळ केला, जातीवाचक शिवीगाळ केली, असेही पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
गेल्या ६५ वर्षांपासून ही शेतजमीन वडिलोपार्जित आमच्या ताब्यात आहे. तीन पिढ्यांपासून आम्ही ही जमीन कसत आहोत. त्याची नोंद सातबारावर सुद्धा आहे. असे असतानाही प्राजक्ता धस यांनी ही जमीन माझी असल्याचा दावा केल्याचा आरोप या पीडित आदिवासी महिलेने केला आहे.
प्राजक्ता धस यांचा गोरगरिबांच्या जमिनी हडपण्याचा धंदा असून या जमिनी त्या लोकांमार्फत ताब्यात घेतात, असा गंभीर आरोपही या पीडित आदिवासी महिलेने फिर्यादीत केला आहे. पीडितेची सून धावत आली तिने या घटनेचा व्हिडीओ केला.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसांनी प्राजक्ता सुरेश धस यांच्यासह रघु पवार आणि राहुल जगदाळे यांच्या विरोधात विनयभंग, जिवे मारण्याची धमकी आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र आमदार सुरेश धस यांनी हे खोटे असल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सुरेश धस, प्राजक्ता धस हिंदू देवस्थान जमीन घोटाळ्यात
बीड जिल्ह्यातील हिंदू देवस्थानच्या जमिनी बळकावल्याच्या घोटाळ्यात भाजप आमदार सुरेश धस, त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस, भाऊ देविदास धस यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध नोव्हेंबर २०२२ मध्ये आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कट रचून देवस्थानच्या जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरण करून फसवणूक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आष्टी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरू असतानाच सुरेश धस यांच्या पत्नीचे जमीन बळकावण्याचे हे नवीन प्रकरण समोर आले आहे.