छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांसारखे ‘मी पुन्हा येईन’ असे सांगितले. मोदींनी स्वातंत्र्यदिनी भाषण करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसते. फडणवीस पुन्हा आले, पण खालच्या पदावर आहेत. मोदी कोणत्या पदावर येतील हे आता सांगण्याची गरज नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला. पुढच्या वर्षी येथेच भेटू, असे मोदी म्हणाले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ईशान्य भारतासंदर्भात बोलण्याऐवजी मी पुन्हा येईन असे म्हटले. त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसते, असे पवार म्हणाले.
याचा अर्थ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच लोकांनी यांची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार केलेला दिसत आहे. हे चित्र आगामी निवडणुकीत दिसेल. त्यामुळे यांनी कितीही जोरजोरात ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे सांगितले तरी मोदींची अवस्था देवेंद्र फडणवीसांसारखी होईल, याबाबत माझ्या मनात शंका नाही, असे पवार म्हणाले.
सध्या मला देशाचे चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही भारताचा नकाशा डोळ्यासमोर ठेवा. केरळमध्ये आज भाजप नाही. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये भाजप नाही. महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. ते आता आले आहे. गोव्यातही भाजपचे सरकार नव्हते. तेही अशाच पद्धतीने आणण्यात आले आहे, असे शरद पवार म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत नाही. ओडिशा, दिल्ली-पंजाब, राजस्थानमध्येही भाजपचे सरकार नाही. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार पाडले आणि भाजप सत्तेत आली, असे ते म्हणाले.
केंद्राच्या निर्णयांमुळे लोकांत कटुता, अंतर वाढले
देशाची सत्ता आज ज्यांच्या हातात आहे, त्या भाजप आणि राज्यकर्त्यांची भूमिका समाजातील सर्व घटकांमध्ये कटुता कशी वाढेल अशीच आहे. इथून पुढे आम्ही सामुदायिकपणे आणि एकत्रितपणे केंद्र सरकारच्या विरोधात जनमत कसे तयार करू शकतो आणि या सरकारला कसा पर्याय देऊ शकतो, यावर विचार करू. केंद्र सरकारच्या अनेक निर्णयामुळे लोकांमध्ये कटुता वाढत आहे, सामाजिक अंतर वाढत आहे. ‘इंडिया’च्या बैठकीत आम्ही हा मुद्दा मांडणार आहोत. याचे गांभीर्य लक्षात आणून देणार आहोत. ‘इंडिया’मध्ये सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांचा समावेश आहे. या सर्वांना त्यांच्या त्यांच्या राज्यात आक्रमक भूमिका घ्यायला लावू, असे शरद पवार म्हणाले.
अजितदादांच्या भेटीत राजकीय चर्चाच झाली नाही
अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आम्ही राजकीय चर्चा केलीच नाही. माझ्याशी कोण चर्चा करणार आहे? ज्या पक्षात हे सर्व नेते होते, त्या पक्षाचा संस्थापक कोण आहे? त्या पक्षाचा वरिष्ठ व्यक्ती कोण आहे? यात आणखी कुणी चर्चा करायला येईल, असे म्हणण्याचे कारण नाही. त्याला कुणीही महत्व देण्याची काहीही गरज नाही, असे शरद पवार म्हणाले.
…ती चर्चा असत्यावर आधारित
अजित पवारांनी तुमच्या सोबत पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना सोबत घेणार का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की त्या बद्दलचा निर्णय मी एकटा घेणार नाही. पक्ष निर्णय घेईल. तुमच्या गुप्त भेटीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाने वेगळा प्लॅन केलाय का? राष्ट्रवादीला बाजूला ठेवन काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येणार का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीला बाजूला ठेवून काँग्रेस-शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा आहे, पण ही वस्तुस्थिती नाही. या सगळ्या गोष्टी असत्यावर आधारित आहेत, असे शरद पवार म्हणाले.
…तेव्हा माणूस या रस्त्याला जातो!
पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत शिवसेनेचा निर्णय झाला त्यामध्ये केंद्र सरकारमधील काही शक्तीशाली घटकाचा हस्तक्षेप झाला. तसा प्रयोग आमच्यावर होण्याची शक्यता आहे. अजून झाला नाही, पण मला चिन्हाची चिंता नाही. मी १४ निवडणुका लढलो. अनेक चिन्ह मिळाली. त्यात मी विजयी झालो. त्यामुळे मला चिन्हाची चिंता नाही. मात्र हा सत्तेचा गैरवापर आहे. राजकीय पक्षांना अडचणीत आणण्याचे धोरण आहे. आपल्याला यश मिळणार नाही, असे दिसले की माणूस या रस्त्याला जातो, असे शरद पवार म्हणाले.