भाजपला धक्का: जळगावचे खासदार उन्मेश पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन!

मुंबईः  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज भाजपला जय श्रीराम ठोकत आपल्या समर्थकांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेतले. उन्मेश पाटलांचा शिवसेना प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उन्मेश पाटील यांचे तिकिट कापले होते. त्यामुळे नाराज होऊन उन्मेश पाटील यांनी भाजपला जय श्रीराम ठोकल्याचे सांगितले जाते, जेथे सन्मान राखला जात नाही, तेथे थांबण्यात काहीच अर्थ नाही, असे उन्मेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हटले आहे.

भाजप खासदार उन्मेश पाटील हे आज दुपारी समर्थकांसह मातोश्रीवर पोहोचले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतले. यावेळी खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते.

 ही लढाई पदाची, जय-विजयाची नाही, ही लढाई आत्मसन्मानाची आहे. विकासाची लढाई आहे. तिथे आत्मसन्मान, संवाद होत नाही म्हणून अनेक कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. आज मी जात्यात आहे, तर अनेक जण सुपात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सुपातील अनेकजण पुढे येतील, असे उन्मेश पाटील यांनी पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील एक नेतृत्व आज आपल्या शिवसेनेत सहभागी होत आहे. त्यांच्याबरोबर पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार आणि असंख्य पदाधिकारी- कार्यकर्तेदेखील आज शिवसेनेत दाखल झाले आहेत. अनेक संघटनांचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उन्मेश पाटील हे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. परंतु निष्ठावंतांच्या नशिबी नेहमीच संघर्ष असतो. म्हणूनच ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेत आले आहेत. पाटील यांच्या शिवसेनेत येण्याने शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात ताकद मिळेल, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

जळगावमधून करण पवार उमेदवारी

खासदार उन्मेश पाटील यांच्यासोबतच शिवसेनेत प्रवेश केलेले पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज लगेच जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर केली आहे. उन्मेश पाटलांच्या शिवसेना प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. ठाकरे यांनी आज चार उमेदवार जाहीर केले. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कामडी, जळगावमधून करण पवार आणि हातकंणगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!