ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाचे चौथे वर्ष सुरू करण्यासाठी महाविद्यालयांनी स्वतंत्र परवानगी घेणे अनिवार्य, वाचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना


मुंबईः तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या संलग्न महाविद्यालयांना पदवीचे चौथे वर्ष सुरू करण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक आहे. पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता असलेल्या महाविद्यालयांना थेट चौथ्या वर्षाचा ऑनर्स अभ्यासक्रम तर पदव्युत्तर पदवीसह पीएच.डी. संशोधन केंद्र असलेल्या महाविद्यालयांना संशोधनासह ऑनर्स (ऑनर्स विथ रिसर्च) अभ्यासक्रम थेट सुरू करता येणार आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून ऑनर्सचे चौथे वर्ष सुरू करता येईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये पदवी अभ्यासक्रमात ऑनर्स आणि संशोधनासह ऑनर्स या चौथ्या वर्षाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांपासून चार वर्षांचा ऑनर्स, संशोधनासह ऑनर्स पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे. मात्र पदवीच्या चौथ्या वर्षाबाबत मार्गदर्शक सूचनाच नसल्याने महाविद्यालयांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ६ एप्रिल रोजी शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

या शासन निर्णयानुसार, बिगर व्यावसायिक म्हणजेच एआयसीटीईशी संबंधित नसलेल्या पदवी अभ्यासक्रमात चौथ्या वर्षासाठी चार वर्षांची ऑनर्स पदवी आणि संशोधनासह ऑनर्स पदवी हे प्रमुख पर्याय उपलब्ध असतील. ऑनर्स आणि संशोधनासह ऑनर्स पदवी अभ्यासक्रमांमध्ये मुख्य विषय, बहुविद्याशाखीय दुय्यम विषय, मुक्त निवड विषय, व्यावसायिक व कौशल्यवर्धन अभ्यासक्रम, क्षमतावर्धन अभ्यासक्रम, मूल्यशिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, सहशैक्षणिक अभ्यासक्रम, ऑन जॉब ट्रेनिंग, क्षेत्रीय प्रकल्प, लोकसहभाग प्रकल्प या घटकांचा समावेश असेल.

ऑनर्स अभ्यासक्रमाच्या चार वर्षांत एकूण १६० ते १७० श्रेयांक पूर्ण करणाऱ्या, चार श्रेयांकांचे कार्यप्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ऑनर्स ही पदवी प्रदान केली जाईल.

संशोधनासह ऑनर्स पदवी अभ्यासक्रमासाठी चौथ्या वर्षाच्या मुख्य विषयात १२ श्रेयांकांचा संशोधन प्रकल्प, प्रबंध पूर्ण करणे अनिवार्य राहील. संशोधनासह ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाच्या १२ श्रेयांकांच्या सातव्या आणि आठव्या सत्रातील विभागणीचा निर्णय संबंधित विद्यापीठ, स्वायत्त महाविद्यालयाने घ्यावयाचा आहे.

ठळक मार्गदर्शक सूचना अशाः

  • चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे चौथे वर्ष कोणत्याही महाविद्यालयाला ‘नैसर्गिक वाढ’ म्हणून दिले जाणार नाही. तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवणारी संलग्न महाविद्यालये, प्रचलित वैधानिक कार्यपद्धतींचे पालन करून, विस्तार म्हणून चौथ्या वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी घेतील.
  • तथापि ज्या महाविद्यालयांना त्याच प्रमुख विषयात पदवी अभ्यासक्रमासोबतच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी आधीच परवानगी आणि मान्यता आहे, त्यांना कोणत्याही अतिरिक्त प्रक्रियेतून न जाता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची आणि पदवी ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाचे चौथे वर्ष चालवण्याची आपोआप परवानगी दिली जाईल.
  • मान्यताप्राप्त पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएच.डी. संशोधन केंद्र असलेल्या महाविद्यालयांना कोणत्याही अतिरिक्त प्रक्रियेतून न जाता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची आणि संशोधनासह पदवी ऑनर्स अभ्यासक्रमाचे चौथे वर्ष सुरू करण्याची आपोआप परवानगी दिली जाईल.
  • केवळ तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी, विद्यापीठ इतर महाविद्यालयांमधील चौथ्या वर्षाच्या ऑनर्स अभ्यासक्रमात प्रवेशासाठी योग्य यंत्रणा विकसित करेल.
  • विद्यापीठाचे विभाग/स्कूल/इन्स्टिट्यूट चार वर्षाच्या ऑनर्स पदवी आणि संशोधनासह ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाचे चौथे वर्ष आपोआप सुरू करतील. येथे संलग्न/स्वायत्त महाविद्यालयांतील विद्यार्थी लॅटरल एंट्रीसाठी परिभाषित केलेल्या प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊ शकतात.
  • ज्या महाविद्यालयांमध्ये संबंधित प्रमुख विषयात पदव्युत्तर कार्यक्रम किंवा पीएचडी संशोधन केंद्र नाही, त्या महाविद्यालयांत अनुक्रमे चौथ्या वर्षाचा ऑनर्स आणि संशोधन कार्यक्रमासह चौथ्या वर्षाचा ऑनर्स सुरू करण्याच्या मंजुरीसाठी संबंधित विद्यापीठांनी योग्य यंत्रणा विकसित करावी आणि अतिरिक्त पात्रता मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत (संशोधन कार्यक्रमासह चौथ्या वर्षाचा ऑनर्स सुरू करण्यासाठी संबंधित प्रमुख विषयात पदव्युत्तर पदवी अनिवार्य असेल.).
  • ज्या महाविद्यालयांमध्ये ४००-स्तरावरील (स्तर ६.०) प्रमुख विषयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि मान्यताप्राप्त प्राध्यापक वर्ग आहे, केवळ तीच महाविद्यालये चौथ्या वर्षाचा ऑनर्स कार्यक्रम सुरू करण्यास पात्र आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर कार्यक्रम नाही, अशा महाविद्यालयांत चौथ्या वर्षाचा नवीन ऑनर्स कार्यक्रम सुरू करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठ आपल्या वैधानिक संस्थांच्या मान्यतेद्वारे या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करेल. (त्यात आवश्यक पायाभूत सुविधा, वैध नॅकचे मानांकन आणि मान्यताप्राप्त प्राध्यापक वर्ग (प्रत्येक बॅचसाठी विषयनिहाय किमान प्राध्यापक संख्या) या घटकांचा समावेश असेल.)
  • ऑनर्स पदवीचे चौथे वर्ष हे तीन वर्षांच्या पदवीनंतरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या समतुल्य असेल. ऑनर्स अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवीच्या तिसऱ्या वर्षाअखेरीस १२०-१३२ श्रेयांक प्राप्त केलेले असणे अनिवार्य असेल. संशोधनासह ऑनर्स पदवीच्या चौथ्या वर्षासाठी १२०-१३२ श्रेयांक आणि ७.५ जीसीपीए प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
  • संशोधनासह ऑनर्स पदवीच्या चौथ्या वर्षासाठीची  मंजूर वर्ग संख्या ही संबंधित विषयात उपलब्ध असलेल्या मान्यताप्राप्त पीएच.डी. मार्गदर्शकांच्या संख्येवर अवलंबून असेल. त्याचे सूत्र असे असेल: मंजूर प्रवेश संख्या = मान्यताप्राप्त पीएच.डी. मार्गदर्शकांची संख्या × ५
  • लॅटरल एंट्री: ज्या महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या विभागात ऑनर्सचे चौथे वर्ष आणि संशोधनासह ऑनर्स पदवीचे चौथ्या वर्षाचा अभ्यासक्रम आधीच मंजूर आहे, तेथे विद्यार्थी चौथ्या वर्षात लॅटरल एंट्री घेऊ शकतात. ऑनर्स पदवी किंवा संशोधनासह ऑनर्स पदवीच्या चौथ्या वर्षासाठी लॅटरल एंट्री ही प्राप्त केलेल्या पूर्वीच्या अध्ययन निष्पत्तींच्या प्रमाणीकरणावर आणि त्या महाविद्यालय/विद्यापीठाच्या विभागाच्या मंजूर प्रवेश क्षमतेवर व महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण धोरणावर आधारित उपलब्धतेच्या अधीन असेल. प्रत्येक विद्यापीठ लॅटरल एंट्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे (पूर्व-अटी, लॅटरल एंट्रीसाठी सुपरन्यूमररी कोटा, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडितमार्फत श्रेयांक हस्तांतरण इत्यादी) निश्चित करेल.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!