
मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मे २०२५ मध्ये घेतलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने हा सर्वसाधारण तसेच मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे. सोलापूर जिल्ह्यातीलच आरती परमेश्वर जाधव ही महिलांमधून राज्यात प्रथम आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २७ ते २९ मे २०२५ या कालावधीत राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल आज आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निकालानुसार विविध २० संवर्गातील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
हा निकाल आणि प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (सीमांकन गुण) आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आलेले आहेत. या निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पुष्ठ्यर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटींच्या अधीन राहून करण्यात आल्या असल्याचे एमपीएसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
उमेदवाराने आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पुर्तता नियुक्तीच्या वेळी न केल्यास आणि शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतुदींनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यांवर रद्द करण्यात येईल, असेही एमपीएससीने म्हटले आहे.
वैद्यकीय तपासणीला गैरहजर राहिलेल्या आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. हा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुद्यांसंदर्भात विविध न्यायालये अथवा प्राधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे. अंतिम निकाल व शिफारस यादी पाहण्यासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळावर थेट जाण्याकरिता येथे क्लिक करा.
