महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्टः भाजपसोबत जाण्याची चर्चा असतानाच अजितदादांचा मुख्यमंत्र्यांना लेटरबॉम्ब… केली ‘ही मागणी

मुंबईः विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या एका पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. खारघर येथील दुर्घटनेला पूर्णतः महाराष्ट्र सरकारच जबाबदार असून त्यासाठी सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी त्यांनी या पत्रात केली आहे.  अजित पवारांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे संकेतच त्यांनी त्यातून दिले असल्याचा अर्थ काढला जात आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने झालेल्या १३ जणांच्या मृत्यूला अजित पवारांनी या पत्रात राज्य सरकारलाच जबाबदार धरले असून या कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. ही दुर्दैवी घटना नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. सरकारच्या नियोजनशून्य आयजोनामुळे निष्पाप अनुयायांचा बळी गेला आहे. या घटनेला आणि मृत्यूला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे, असा ठपका अजित पवारांनी या पत्रात ठेवला आहे.

 या घटनेला जबाबदार धरून सरकारविरोधात तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटी आणि ही दुर्दैवी घटना याची निवृत्त न्यायाधीशाकडून चौकशी करावी, मृतांच्या नातेवाईकांना केवळ ५ लाख रुपयांची तुटपुंजी मदत करून सरकारने आपली जबाबदारी झटकू नये. मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रत्येक कुटुंबीयांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि जखमींवर मोफत उपचार करून त्यांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करण्यात यावी, असे अजित पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

 ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारने सन्मानित करण्याचा सोहळा १६ एप्रिल रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला लाको अनुयायी उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान अनेक अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला. तब्बल ७ तास लाखो अनुयायी उन्हात बसून होते. या दरम्यान प्रचंड उन्हामुळे अनेकांना चक्कर आली, अनेकांना उलटीचा त्रास झाला. या दुर्दैवी घटनेत १३ निष्पाप अनुयायांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता, असे अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राज्यातील मागील काही दिवसांतील तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस आहे. उष्णतेची प्रचंड मोठी लाट आलेली आहे. साहजिकच अशा प्रकारच्या गौरव सोहळ्याला लाखो अनुयायी उपस्थित राहतील, ही धारणा लक्षात घेणे गरजेचे होते. एवढा भव्यदिव्य कार्यक्रम मोकळ्या मैदानावर, दुपारच्या वेळी आयोजित करून निष्पाप अनुयायांच्या जीवाशी खेळण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाले, अशी भावना सर्वसामान्यांची झाली आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

उष्णतेची प्रचंड लाट आलेली असताना बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित करून त्याचे थेट प्रक्षेपण करून हे मृत्यू टाळता आले असते. परंतु काही तरी भव्यदिव्य करून दाखवण्याच्या अट्टाहासापायी निष्पाप अनुयायांना वेठीस धरले गेले आणि त्यात १३ अनुयायांचा नाहक बळी गेला, असे अजित पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!