
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांनी आपल्या पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रा. डॉ. सरवदे यांची मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्रोफेसरपदी निवड झाली असून ते उद्या मंगळवारी तेथील पदभार स्वीकारणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी २९ जानेवारी २०२४ रोजी प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांची प्रभारी प्रकुलगुरूपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीला ४८ तास उलटण्याच्या आधीच डॉ. फुलारी यांनी त्यांचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. कुलगुरू फुलारींच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी चळवळीत असंतोष उफाळून आला होता.
१० फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीत कुलगुरू फुलारी यांनी पूर्णवेळ प्रकुलगुरूपदासाठी प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांचे नाव मांडले. त्यांच्या नावाला सर्व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी मान्यता दिली आणि ही बैठक संपल्यानंतर त्याच दिवशी प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांनी प्रकुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला होता.
कुलगुरूपदाचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे यापेक्षा जे आधी घडेल ते असा असतो. विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार प्रकुलगुरूपद हे कोटर्मिनन्स म्हणजेच कुलगुरूंचा कार्यकाळ जेव्हा समाप्त होतो, तेव्हाच प्रकुलगुरूपदाचा कार्यकाळ समाप्त होतो. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये आधी प्रकुलगुरूपदासाठी सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे होते. या कायद्यात २०१९ मध्ये सुधारणा करून कुलगुरूपदाप्रमाणेच या पदाचाही कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे यापेक्षा जे आधी घडेल ते असा करण्यात आला होता. प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे हे प्रकुलगुरूपदावर अवघे दोन वर्षे दोन महिनेच राहिले आणि आज त्यांनी राजीनामा दिला.
दरम्यान, प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांची मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर) प्रोफेसरपदी निवड झाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाची या चेअरला मंजुरी आहे. या पदावर त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. या चेअरच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्या, समता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाशी निगडित विचार शैक्षणिक व धोरणात्मक पातळीवर प्रसारित केले जातात.
आता ‘हार्डकोअर स्वयंसेवका’ची वर्णी?
२०१४ मध्ये देशात सत्तांतर होऊन आरएसएसची राजकीय आघाडी असलेल्या भाजपची सत्ता आल्यानंतर देशातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्रकुलगुरू निवडीच्या पारंपरिक निकषांत या पदांवर निवडायची व्यक्ती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित असली पाहिजे किंवा ती किमान परिवारातील तरी असली पाहिजे, असा अघोषित निकषच समाविष्ट करण्यात आला. त्या निकषांनुसारच कुलगुरू आणि प्रकुलगुरूपदी संघधार्जिण्या व्यक्तींची वर्णी लावली जाऊ लागली आहे.
महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या १३ अकृषि विद्यापीठांपैकी बहुतांश विद्यापीठांच्या प्रकुलगुरूपदी हार्डकोअर संघधार्जिण्या व्यक्तींचीच वर्णी लावण्यात आली आहे. त्याला अपवाद फक्त छत्रपती संभाजीनगरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ होते. आंबेडकरी चळवळीशी नाळ जुटलेली असलेल्या प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे हे त्या निकषात बसत नव्हते. त्यामुळे या विद्यापीठातही हार्डकोअर संघधार्जिण्या व्यक्तीची वर्णी लावण्यासाठीच हे प्रकुलगुरूपद रिकामे करून घेण्यात आल्याची चर्चा उच्च शिक्षण क्षेत्रात होऊ लागली आहे. आता १७ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार असून या बैठकीत नव्या प्रकुलगुरूंची नियुक्ती केली जाईल. त्यावेळी ज्या नावावर शिक्कामोर्तब होईल, तेव्हाच या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
