
पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे…
-ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल.
पावसाळा आणि वीजपुरवठा यांचे नाते सर्वांनीच गृहित धरलेले असते. अर्थात, विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करणे शक्य नाही, इतके तिचे महत्त्व वाढलेले आहे. त्यामुळे वीज गेली की, आपल्या संतापाचा पारा चढतो. परंतु वीज जाते, हे वास्तव आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. दुसऱ्या दिवशी त्याची बातमीही होते. परंतु, वीज का गेली, का जाते, याचे उत्तर बहुतेकांना माहीत नसते.
रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच ती परत येते. विजेची यंत्रणा अशी आहे की, ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाचा धोका असतो. रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात परत येते, तेव्हा कोणीतरी त्या पावसात-अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून खांबावर चढलेला असतो. तेव्हा कुठे वीज येते. त्यामुळे वीज यंत्रणेवर दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे.
सारा पसारा उघड्यावर: पारंपरिक अथवा अपारंपरिक स्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून निर्माण झालेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी लाखो किलोमीटर वीजवाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला ‘ग्रीड’ म्हणतात. हा सारा पसारा उघड्यावर आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात, तर कधी हा बिघाड गाव किंवा काही भागापुरता मर्यादित असतो.
पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळवारे व आकाशाच्या विजेतील कडकडाट सर्वांनी अनुभवलेला आहे. तारेच्या जाळ्यांमधून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज, दोन्हींमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की, घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण, उच्च दाबामुळे ती जळण्याची शक्यता असते. दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. नव्हे, तशी सोयच यंत्रणा वाचवण्यासाठी केलेली असते.
हानी टाळण्यासाठी यंत्रणा: दुसरी बाब म्हणजे वीज खांबात विद्युतप्रवाह उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर खांबावर बसविले जातात. बहुधा ते उन्हामुळे किंवा विद्युतप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात, ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लगेचच आपात्कालिन यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर (वीजवाहिनी) बंद पडतो. जर हा फीडर बंद पडला नाही तर जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो.
बिघाड शोधणे जिकिरीचे: जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही, याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फीडर चालू केला जातो. जर फीडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते. तथापि, बिघाड शोधणे जिकिरीचे असते. ऊन-वाऱ्याची, पावसाची अथवा अंधाराची तमा न करता ही शोध मोहीम हाती घेतली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात, तर कधी हा बिघाड काही खांबांदरम्यान सापडतो.
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग: वीज कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सदैव सज्ज राहावे लागते. चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ बांधूनच त्यांना खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारची काळजी घेऊनही वीज कर्मचाऱ्यांना प्राणांतिक अपघात होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. परंतु, मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की, एखाद्याच्या जिवाचे मोलही आपण ध्यानात घेत नाही. वीज जाते आणि येते, यादरम्यान काय होते, याचा विचार आपण जेव्हा करू त्यावेळी आपण महावितरण किंवा कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला दोष देणार नाही.
वीज गेल्यास काय करावे आणि काय करू नये?
१. आपल्या घरात आरसीसीबी (रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.
२. अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.
३. वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.
४.वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
५.विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.
६.वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा.
७.बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा.
८.विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. तातडीने महावितरणला माहिती द्यावी.
माहिती देण्यासाठी विविध पर्याय
वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. त्यासाठी महावितरणच्या 1912, 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. तसेच आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिसकॉल द्यावा अथवा NOPOWER <ग्राहक क्रमांक> हा एसएमएस 9930399303 या क्रमांकावर पाठवावा.
महावितरणच्या मोबाईल ॲपवरूनही ग्राहक ही माहिती देऊ शकतात. अतिवृष्टी, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वीजवाहिन्या तुटणे, खांब कोसळणे अथवा विद्युत दुर्घटनेची शक्यता निर्माण झाल्यास त्याची माहिती टोल फ्री क्रमांकांवर किंवा स्थानिक नियंत्रण कक्षाच्या 7066042412 (छत्रपती संभाजीनगर शहर मंडल), 7875756652 (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडल) व 7875764144 (जालना मंडल) या क्रमांकांवर तत्काळ द्यावी.
