मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा शिवशक्ती- भीमशक्तीचा प्रयोग पहायला मिळणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडी-शिवसेना यांच्यात युतीच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जाते. मात्र महाविकास आघाडीतील चौथा घटक पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी सामील होणार की शिवसेना-वंचितची वेगळी युती आकाराला येणार? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आज मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर हजर होते. तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर हजर होते. या बैठकीतच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आता उद्या दुपारी १२ वाजता वरळीतील फोर सिझन्स हॉटेल येथे बैठक होणार आहे. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात असून या बैठकीनंतर शिवसेना- वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या ग्रँड हयात हॉटेलमधील बैठकीबाबत दोन्ही बाजूंनी गुप्तता राखण्याचा प्रयत्न झाला. परंतु माध्यमांना या बैठकीची कुणकुण लागली आणि अनेक अंदाज बांधले जाऊ लागले. यापूर्वी प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या प्रकाशनानिमित्त प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे एका मंचावर आले होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या संकेतस्थळाच्या प्रकाशन समारंभात बोलतानाच दोघांचेही वैचारिक व्यासपीठ एकच असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
प्रकाश आंबेडकर यांनीही याच कार्यक्रमात बोलताना शिवसेनेसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले होते. तेव्हापासून शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीचे अंदाज बांधले जाऊ लागले होते. आज त्या अंदाजांवर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज झालेल्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी कश्याप्रकारे एकत्र येऊ शकतात, या फॉर्म्युल्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी करून पक्षात फूट पाडल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर नव्या जोमाने राजकीय भरारी घेण्याचे खडतर आव्हान आहे. तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात प्रचंड पाठिंबा असूनही त्या पाठिंब्याचे रुपांतर निवडणुकीतील विजयात होत नसल्याचे आव्हान आहे. अशा पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला असला तरी महाविकास आघाडीतील चौथा घटक पक्ष म्हणून वंचित सामील होणार की त्यांची युती केवळ शिवसेनेसोबत असणार? हे मात्र स्पष्ट झालेले नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया काय असेल? यावरच वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतील चौथा घटक पक्ष असेल की शिवसेना- वंचित बहुजन आघाडी यांची स्वतंत्र युती असेल, हे निश्चित होणार आहे.