महाराष्ट्रातही ‘उडता पंजाब’?: छत्रपती संभाजीनगरात २५० कोटींपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्ज जप्त, डीआरआयची मोठी कारवाई!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राज्यात ड्रग्ज प्रकरण गाजत असतानाच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि पैठण एमआयडीसीमध्ये छापेमारी करून अहमदाबाद येथील केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा (डीआरआय) आणि  गुन्हे शाखेच्या पथकाने  कोकेन, मेफेड्रॉन आणि केटामाइन या तीन प्रकारच्या ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या या अंमली पदार्थांची किंमत २५० कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून छापेमारीच्या कारवाई दरम्यान एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

गुजरातमधील ड्रग्जशी संबंधित एका गुन्ह्याचा तपास करत असताना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अंमली पदार्थांचे उत्पादन करणारा कारखाना असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. त्याचा शोध घेण्यासाठी अहमदाबादमधील डीआरआयचे पथक, अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक आणि पुण्यातील डीआरआयचे पथक २० ऑक्टोबरपासून छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले होते.

या पथकाने नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रापिक पदार्थांचा शोध घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोध मोहीम राबवली. पैठण एमआयडीसीमधील महालक्ष्मी इंडस्ट्रीज हा कारखाना मेफेड्रॉन आणि केटामाइन या अंमली पदार्थांच्या उत्पादनात गुंतलेला असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून डीआरआयच्या पथकाने महालक्ष्मी इंडस्ट्रीजची तपासणी केली असता ४.५ किलो मेफेड्रॉन, ४.३ किलो केटामाइन आणि सुमारे ९.३ किलो वजनाचे मेफेड्रानचे आणखी एक मिश्रण असलेला साठा जप्त करण्यात आला.

 डीआरआयच्या पथकाने  एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार संदीप शंकर कुमावत (वय ४०, रा. वाळुज) आणि जितेशकुमार हिनोरिया प्रेमजीभाई ( वय ४५, रा. गोलवाडी) या दोघांना अटक केली आहे. अटकेनंतर संदीप कुमावतला पैठण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यासमोर हजर केले असता त्याला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डीआरआयच्या पथकाने आरोपींच्या घराची झडती घेतली असता २३ किलो कोकेन, २.९ किलो मेफेड्रॉन आणि ३० लाख रुपये रोख जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सर्व अंमली पदार्थांचे बाजार मूल्य २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

गुजरातमधून हे कोकेन छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले जात होते व येथून ते इतर ठिकाणी असलेल्या डिलर्सना पुरवठा केले जात होते. जितेशकुमार आणि संदीपच्या माध्यमातून हे ड्रग्ज कोणाकोणाला पोहोचवले जात होते, याचा तपास आता डीआरआयचे पथक करत असून या प्रकरणात आणखी काही मोठे मासे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत असू शकतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्राचे गृह मंत्रालय झोपले आहे का?: दानवे

दरम्यान गुजरातच्या डीआरआय आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे गृह मंत्रालय झोपले आहे का? गुजरात राज्याच्या गुन्हे शाकेचे पोलिस माहिती देतात की संभाजीनगरात कुठे काय आहे! बाहेरच्या टीम संभाजीनगर येथे येऊन तब्बल ५०० कोटींचे ड्रग्ज आणि त्यासंबंधीचे साहित्य जप्त करतात. एवढा मोठा व्यवसाय येथे राजरोस सुरू असतो आणि इथे थांगपत्ता नाही, असे कसे होईल? यात गृह खातेच सहभागी आहे का? असा सवाल इथे उभा राहतो, असे दानवे यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!