
सोलापूर/पुणेः राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाच पुण्यात सनदी लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीचा सोलापुरात मृत्यू झाला. गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे एखाद्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना मानली जाते.
मूळचा सोलापूरचा असलेला ४० वर्षीय सनदी लेखापाल पुण्याच्या धायरी परिसरातील एका कंपनीत नोकरी करित होता. ११ जानेवारी रोजी त्याला गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्याला उलट्यांचा त्रास वाढला होता.
गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाल्यानंतर या सनदी लेखापालाने पुण्याऐवजी सोलापुरात स्वतःच्या गावी येऊन वैद्यकीय उपचार घेण्याचा निर्णय घेतला होता. सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्रकृती आणखी बिघडली.
प्रकृती बिघडल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. पाच दिवसांनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले होते. परंतु पुन्हा त्याची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराष्ट्र सर्वोपचार शासकीय रुग्णालयात चार तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी केली. या तपासणीत या सनदी लेखापालाचा मृत्यू गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. रासायनिक पृथःकरण अहवाल येण्यास किमान पंधरा दिवस लागणार आहेत. त्यावेळीच मृत्यूचे अंतिम कारण समोर येणार आहे.
जीबीएस रुग्णांवर पुण्यात मोफत उपचार
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमबाधित रुग्णांची संख्या ७३ वर पोहोचली असून मागील दोन दिवसांत रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ आणि या आजारावरील उपचारासाठी लागणारा खर्च लक्षात घेता पिंपरी चिंचवड येथील रुग्णांवर वायसीएम रुग्णालयात तर पुणे शहरातील रुग्णांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. ग्रामीण भागातील रुग्णांवर पुण्यातील ससून रुग्णालयात मोफत उपचार करण्याबाबतचा निर्णय उद्या (सोमवारी) मुंबईत गेल्यावर घेतला जाईल, असे पवार म्हणाले.
अनावश्यक बिले आकारल्यास कारवाई
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पाण्यामुळे हे इन्फेक्शन होते, ही बाब निदर्शनास आली आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या हा आजार महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या आजारावरील उपचारासाठी रुग्णालये अनावश्यक बिल जर घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
